राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहर हद्दीतील एका प्रतिष्ठित व्यापार्याकडे चोरीची दुचाकी आढळून आली आहे. पोलिसांनी सध्या ती दुचाकी ताब्यात घेतली असून त्या व्यापार्याची चौकशी चालू आहे.

मी ती दुचाकी एका महिलेकडून विकत घेतली आहे. असे तो व्यापारी सांगत आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, राहुरी तालुक्यात दुचाकी चोर्या वाढल्याने आता या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. दि. 3 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजे दरम्यान राहुरी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकार्याला आपल्या गुप्त खबर्यामार्फत माहिती मिळाली, राहुरी शहरातील जैन स्थानक परिसरात एका प्रतिष्ठित व्यापार्याकडे निळ्या रंगाची एक दुचाकी आहे. ती दुचाकी चोरीची आहे. खबर मिळताच त्या पोलीस अधिकार्याने काही पोलीस कर्मचारी सोबत घेऊन जैन स्थानक परिसरातील त्या व्यापार्याच्या घरी दाखल झाले.

यावेळी ती दुचाकी त्या व्यापार्याच्या घरासमोरच उभी होती. पोलीस अधिकार्यांनी त्या व्यापार्याला विचारले, दुचाकी कोणाची आहे? त्यावेळी व्यापारी म्हणाला, माझीच दुचाकी आहे. मी एका महिलेकडून विकत घेतली आहे. असे त्या व्यापार्याने सांगितले. यावेळी पोलीस अधिकार्यांनी त्या दुचाकीचे कागदपत्र मागितले.

परंतु त्या व्यापार्याकडे दुचाकीचे कागदपत्र नव्हते. ज्या महिलेकडून त्या व्यापार्याने दुचाकी घेतली, त्या महिलेकडे चौकशी केली. तर तिच्याकडेही दुचाकीचे कागदपत्र नव्हते. ती दुचाकी माझ्या भावाकडून आणल्याचे त्या महिलेने सांगितले. मात्र, दुचाकीचे कागदपत्र नसल्याने ती दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. आणि कागदपत्र आणून दाखवा व दुचाकी घेऊन जा. असे पोलीस अधिकार्यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत त्या व्यापार्याची पोलीस चौकशी करीत होते.

ती दुचाकी चोरीची आहे का? विकत घेतली आहे. याची चौकशी पोलीस करीत आहेत. मात्र, विना कागदपत्राची दुचाकी घेणारा तो जैन स्थानक परिसरातील व्यापारी कोण? ती महिला कोण? परजिल्ह्यातून राहुरी शहरात ती दुचाकी आली कशी? दुचाकी जर चोरीची असेल तर कोणा कोणावर गुन्हा दाखल होणार? याबाबत शहरात चर्चा सुरू आहे.