राहुरी तालुक्यात खतांचा प्रचंड तुटवडा

बळीराजाची खतांसाठी पायपीट
राहुरी तालुक्यात खतांचा प्रचंड तुटवडा

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर तालुक्यात युरिया खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून कोणी युरिया देतं का, युरिया? अशी आर्त हाक बळीराजा देत आहे. परंतु त्याची हाक ऐकायला एकही पुढारी व नेता तयार नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

एकीकडे करोना महामारीचे संकट तर दुसरीकडे लॉकडाऊन मुळे शेतीची पुरती वाट लागली. अशा दुहेरी संकटात सापडलेला बळीराजा पुन्हा एकदा रासायनिक खताच्या तुटवड्यात सापडला आहे. दरवर्षीच खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताच्या किंमती वाढविण्यात येतात. खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येते. सध्या तालुक्यात ऊस पिकासाठी व चारा पिकांसाठी युरिया खताची खूप गरज आहे. तसेच खरीप तोंडावर असल्याने मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. याबाबत तालुका कृषी विभागाशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले, तालुक्याच्या कृषी विभागाने खते, बियाणे याची आकडेवारी शासनाकडे पाठवून दिलेली आहे. तरी देखील याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही. ही शेतकर्‍यांच्या दृष्टीने मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.

सध्या शेतकर्‍यांना युरिया खताची मोठी गरज असतांना तालुक्यात कुठं चमचाभर सुध्दा युरिया नाही. याबाबत संबंधित अधिकारी व कृषीसेवा चालकांना विचारणा केली असता त्यांचे उत्तर ठरलेले आहे. एक-दोन दिवसात रँक लागणार आहे. आपल्याला युरिया मिळणार आहे. किती ते नक्की सांगता येणार नाही. कधी येणार ते नक्की सांगता येणार नाही. अशी उत्तरे मिळत आहे. याबाबत पुढार्‍यांना विचारले असता एकजण तर म्हणाले, आता आमची सत्ता नाही. आमच्या ताब्यात सत्ता होती तेव्हा असे नियोजन नव्हते.

मुबलक युरिया व इतर खते मिळत होती. आता आपली सत्ता नाही ना त्यामुळे कोणी ऐकत नाही. बरे सत्ताधार्‍यांना विचारले असता, थांबा तुम्ही गडबड करु नका, आमचं कृषी मंत्री व महसूल मंत्री यांच्या सोबत बोलणं झालं आहे. एक-दोन दिवसात नक्की युरिया मिळेल. तुम्ही काळजीच करु नका. तिसर्‍याने तर यावर कळसच केला म्हणाले, आत्ताच जयंत पाटलांशी बोललो ते म्हणाले, तुमच्यासाठी उद्याच रँक लागणार आहे. आणि आपल्याला भरपूर युरिया मिळणार आहे. कोणी म्हणतो दादांशी बोललो, कोणी म्हणतो खासदाराशी बोललो. अहो बोलले तर मग युरिया का येईना? शेतकरी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहे. अहो लबाडाच आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं असा हा प्रकार आहे. युरिया साठी शेतकरी त्राही माम, त्राही माम झाला असतांना याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. बिचारा, बापडा बळीराजा कधी युरिया येणार? याकडे डोळे लावून बसलाय.

रासायनिक खताचा कोटा पहिल्यांदा सहकारी संस्थांना देण्यात येतो. नंतर खासगी कृषीसेवावाल्यांना दिला जातो. सहकारी संस्थांमध्ये युरिया येण्याअगोदर बिले तयार असतात. युरिया आल्यानंतर फक्त रांगेत उभे राहून बिले करण्याचा फार्स करण्यात येतो. तास-दोन तासात वाटप संपल्याचे सांगण्यात येते. अशाचप्रकारे कृषीसेवावाले करतात. फक्त पध्दत वेगळी! युरिया बरोबर आमुक आमुक घ्या तरच युरिया मिळेल, असे वेठीस धरले जाते. धनदांडग्यांना मात्र, मागच्या दाराने लागेल तेव्हढा युरिया मिळतो. वरुन शासन म्हणते, शेतकर्‍यांची फसवणूक केल्यास गय केली जाणार नाही? सांगा काय करायचं, सर्वसामान्य शेतकर्‍यांनी!

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com