राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

दिवसेंदिवस वाढत असलेली गॅस, पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी राहुरी येथे शिवसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकार्यांचे आदेश धुडकावून लावणार्या शिवसेनेच्या सुमारे 20 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध घातले आहेत. तसे आदेश जारी करण्यात आले. हे माहीत असताना देखील जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दिवसेंदिवस गॅस, पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत आहे. ती दरवाढ थांबविण्यात यावी. या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने हे रस्तारोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी हातात झेंडे घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली होती.

राहुरी पोलीस ठाण्यातील हवालदार अशोक महादेव कोळगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोमनाथ मच्छिंद्र हारदे, गणेश खेवरे, अमोल खेवरे रा. देसवंडी, कैलास शेळके रा. राहुरी खुर्द, तसेच इतर 10 ते 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रविण खंडागळे करीत आहेत.