
उंबरे |वार्ताहर| Umbare
राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर गतिरोधक, पांढरे पट्टे, झेब्रा क्रॉसिंग काम कधी सुरू करणार? ठेकेदाराविरोधात हलगर्जीपणा केला म्हणून गुन्हे दाखल करा आदी मागण्यांसाठी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली उंबरे गावात काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रास्ता रोको सुरू झाला त्यावेळेस बांधकाम विभागाचे अधिकारी दिलीप तारडे व कर्मचारी यांना आमदार तनपुरे यांनी धारेवर धरत वरिष्ठ अधिकार्यांशी बोलल्याशिवाय रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले. वेळ पडली तर जनतेच्या जीवापेक्षा आमचाही जीव महत्त्वाचा नसून आमच्यावरती गुन्हे दाखल करा, असा इशारा आ. तनपुरे यांनी देताच अधिकारी नरमले.
दरम्यान उपस्थित बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून आमदारांशी बोलणे करत लेखी आश्वासन दिले. सदर रस्त्यावर गतिरोधक बसवण्यासाठी डेटलाईन देण्यात आली.
या रस्त्याने किमान 100 पेक्षा अधिक निष्पाप जीवांचा बळी गेला असून हे सर्व ठेकेदार व अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे झाले. वेळोवेळी अधिकार्यांना तोंडी सूचना दिल्या. लेखी दिले. पण अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केेले. याकडे लक्ष देत नसल्यामुळे अखेर आ. तनपुरे यांना रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आली. शिंगणापूर फाट्यापासून ते सोनईपर्यंत अतिशय रहदारी असणारा हा रस्ता आहे. शेतकरी, महिला, मजूर, शाळकरी मुले रस्त्याने ये-जा करत असतात.
अनेक शाळकरी मुलांनाही आपला जीव अपघातामध्ये गमवावा लागला आहे. प्रत्येक गावामध्ये रस्त्याचा उतार हा खूप खोलवर गेला आहे. अनेक शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्याची उंची वाढल्यामुळे शेतात जाणारा रस्ता खोलवर गेला आहे. त्या रस्त्याची अजिबात दुरुस्ती केली नाही. कुठल्याही साईट पट्ट्या भरलेल्या नाही. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अरुंद झालेले आहे. याची सगळी तपासणी होऊन या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.
भविष्यात याबाबत कोर्टात जाण्याची तयारी असल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, प्रा. दत्तात्रय आडसुरे, साहेबराव दुशिंग, भारत तारडे, तहसीलदार राजपूत, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, अॅड. केरू पानसरे, सुनील अडसुरे, नवनाथ ढोकणे, कारभारी ढोकणे, बाळासाहेब देशमुख, माणिक तारडे, बाळासाहेब शेळके, गोरक्षनाथ दुशिंग, बाळासाहेब लटके, सुरेश निमसे, मधुकर पवार, सचिन भिंगारदे, बाळासाहेब खुळे, महेश पानसरे, सरपंच दीपक मकासरे, सरपंच सुरेश साबळे, जगन्नाथ चौधरी, सुरेश लांबे, गंगाधर अडसुरे, संदीप दुशिंग, संतोष ढोकणे, दत्तात्रय ढोकणे, संजय ढोकणे, अशोक ढोकणे, महेश उदावंत, ईश्वर कुसमुडे, विजय माळवदे, अनिल ढोकणे, भाऊराव कवडे, अच्युत दुशिंग आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.