7 हजार लोकसंख्येच्या पदरात पडल्या 50 लस

राहुरी तालुक्यातील सात्रळची दुर्दशा; लसीकरणाचा तालुक्यात बोजवारा
7 हजार लोकसंख्येच्या पदरात पडल्या 50 लस

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील लसीकरणाच्या यशस्वी फॉर्म्युल्याची चर्चा सुरू असतानाच राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे सातहजार लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 50 लस नागरिकांच्या पदरात पडल्या आहेत. त्यामुळे आता तेथील आरोग्य प्रशासनासह नागरिकांनाही या औदार्यापुढे हसावे की रडावे? अशी संभ्रमावस्था झाली आहे. तर तालुक्यातील अनेक ठिकाणी राहुरी शहर वगळता लसीकरण ठप्प झाले आहे. देवळाली प्रवरा येथेही सुमारे 50 हजाराहून अधिक लोकसंख्या असली तरीही गेल्या आठ दिवसांपासून लसीकरण ठप्प झाले आहे.

एकीकडे जगातील शास्त्रज्ञांच्या मते करोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्वाचे पाऊल असल्याचा सल्ला देत असताना दुसरीकडे खेडोपाडी असलेल्या छोट्या आरोग्य उपकेंद्रांना पाहिजे तितक्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

सात्रळ गावाची लोकसंख्या 7078 असताना येथील आरोग्य उपकेंद्रास आत्तापर्यंत फक्त 50 लसीचे डोस उपलब्ध झाले असून लसीकरण योजनेचे तीन-तेरा झाल्याचे चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार 380 व्यक्तींचा पाहिला डोस लसीकरण झालेले असून 151 जणांना दुसरा डोस मिळालेला आहे. यातील बहुतांशी व्यक्तींनी येथील उपकेंद्रात लस उपलब्ध नसल्यामुळे बाहेरगावी जाऊन लस घेतलेली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस मिळण्याकरीता गुहा केंद्रावर हेलपाटे मारावे लागल्याने मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

तालुक्यातील मंत्र्यांनी गाव तिथे लसीकरण या राबिवलेल्या योजनेचा प्रवरा पट्ट्यातील गावांमध्ये पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र आहे. नुकत्याच पंतप्रधानांबरोबर झालेल्या सचित्र मुलाखतीत जिल्हाधिकार्‍यांनी करोनाविरुद्ध उपाययोजनांची माहितीची सकारात्मक चर्चा असताना दुसरीकडे याच जिल्ह्यातील छोट्या उपकेंद्रांना लसीच्या तुटवड्यामुळे सरकारी योजना कागदावरच का? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे. सात्रळ उपकेंद्रास तातडीने गरजे इतका लस पुरवठा होण्याची मागणी विखे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, रमेश पन्हाळे, सोनगावचे उपसरपंच किरण अंत्रे व ग्रामस्थ यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com