राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी

राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करणे, यासाठी विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

राहुरी येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव समिती यांच्यावतीने नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, राज्यात ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी असे तीन उपगट व व्हिजेएनटीचे आणखी चार उपगट असले तरी या सर्व जातीजमाती केंद्रीय यादीत ओबीसी म्हणूनच ओळखल्या जातात. तसेच पंचायत राज्यातील राजकीय आरक्षणासाठी त्या सर्वांना ओबीसी म्हणूनच मान्यता आहे.

मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा नेते व गायकवाड आयोगाचे सर्वेक्षणाचे कंत्राट मिळविणार्या छत्रपती शिवाजी प्रबोधीनी या संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सराटे यांनी जनहित याचिका दाखल करून ती स्विकारली आहे. लवकरच तिची सुनावणी होईल. सराटे यांनी राज्यातील सर्वच्या सर्व ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी, जातीजमातींचे आरक्षण बंद करण्याची मागणी केलेली आहे.

याचा अर्थ 1950 पासून अस्तित्वात असलेले व्हिजेएनटी आरक्षण, 1967 पासून मिळणारे ओबीसी आरक्षण व 1990 च्या दशकात सुरू झालेले एसबीसी न्यायालयाच्या मार्गाने रद्द करण्याचा कट आखण्यात आला आहे. त्यासाठी दिलेली कारणे निराधार, कपोलकल्पित आणि ओबीसीद्वेषावर आधारलेली आहेत.

या जातीजमातींचा कोणताही अभ्यास न करता त्यांना आरक्षण दिलेले आहे. हा सराटे यांचा आक्षेप बिनबुडाचा आहे. प्रत्यक्षात बी. डी. देशमुख आयोग, मंडल आयोग, मुटाटकर समिती, न्यायमूर्ती खत्री आयोग, न्यायमूर्ती बापट आयोग, न्यायमूर्ती सराफ आयोग, न्यायमूर्ती भाटीया आयोग यांनी सखोल अभ्यास करूनच या जातीजमातींना आरक्षण दिलेले आहे. आज हे आरक्षण संपविण्याचा दोन पातळ्यांवर घाट घातला जात आहे. मुंबई व दिल्लीच्या न्यायालयात विविध अर्ज करून सर्व ओबीसींना बाहेर काढण्याचे कट कारस्थान केले जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर समता परिषद जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, राहुरी नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष अनिल कासार, तालुकाध्यक्ष हेमंत गिरमे, नाभिक एकता महासंघ जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब बिडवे, अधिकारी कर्मचारी महासंघ अध्यक्ष कल्याण राऊत, संत सावता माळी युवक संघ जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, नाभिक संघ तालुकाध्यक्ष सुनील कोपे, किशोर दुधाडे, प्रविण शिरसाठ, भूषण मदने, किशोर राऊत, रवींद्र उदावंत, संदीप राऊत, ओंकार कासार, जीवन गुलदगड, महेश उदावंत, योगेश गोरे, शुभम धाडगे, मयुर दुधाडे, प्रसाद कोरडे, सागर शिरसाठ, पारस कुंभार, महेश गुलदगड आदींच्या सह्या आहेत.

यावेळी प्रशांत शिंदे, रवींद्र उदावंत, कल्याण राऊत, संजय संसारे, अनिल कासार आदींनी मनोगत व्यक्त करून ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, अशा मागण्या केल्या आहेत.