
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी शहरातील पाण्याची टाकी ते स्टेशन रस्त्यावरील नाका नं.5 पर्यंत रस्ता मजबुतीकरणाचे काम पूर्ण होवून रस्ता दुभाजक तयार करण्याचे काम चालू आहे, ते तात्काळ थांबविण्याची मागणी शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अहमदनगर येथे सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांची भेट घेऊन केली आहे.
यावेळी लांबे यांनी सांगितले की, रस्ता दुभाजकाची रुंदी जास्त असल्याकारणाने एकावेळी रस्त्यावरून एकच चारचाकी वाहन जाऊ शकते. रस्त्याच्या कडेला भराव नसल्याने मोठे वाहन रस्त्यावरून मागून आल्यास दुचाकी वाहन चालकाचा किंवा पायी चालणार्या व्यक्तीचा अपघात होऊ शकतो. रस्ता दुभाजकामुळे रस्त्याच्या बाजूच्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होणार आहे.
या रस्त्याची उंची व नागरिकांची घरे, दुकाने यांची उंची लक्षात न घेतल्यामुळे मोठ्या प्रमणात पाऊस झाल्यास अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असून सर्वसामन्यांचा हिताचा निर्णय घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ थांबवून रस्त्याच्या कडेला भराव टाकावा व सांडपाणी, अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जाणार नाही या कामी उपाय योजना करण्याची मागणी लांबे यांनी केली आहे.या प्रसंगी अशोक तनपुरे,प्रशांत खाळेकर, महेंद्र उगले, नितीन पटारे, दादासाहेब बडाख, संभाजी निमसे, महेंद्र शेळके आदी उपस्थित होते.
राहुरी शहरातील डॉ. खुरुद हॉस्पिटल ते अग्निशामन दल इमारत पर्यंत रस्ता दुभाजक करू नये, अशी मागणी राहुरी नगरपरिषदेकडे त्यावेळी करण्यात आली होती. या रस्ता दुभाजकामुळे मोठी अडचण निर्माण होऊन केलेला खर्च व्यर्थ गेला आहे. आता पुन्हा रस्त्याची उंची वाढविण्यासाठी अधिक निधी खर्च होणार आहे.
देवेंद्र लांबे