राहुरी (प्रतिनिधी) -

मागील वर्षी राहुरी तालुका महसूल प्रशासनाला 100 टक्के उद्दिष्ट गाठता आले नाही. केवळ 55 टक्क्यांवरच समाधान मानावे लागले. करोना महामारीमुळे

लॉकडाऊन असल्याने उद्दिष्टात सुमारे 45 टक्के घट झाली. त्यातच अतिवृष्टीमुळे प्रवरा आणि मुळा नदीपात्रातील वाळूसाठ्यांचे लिलाव होऊ शकले नाही. त्यामुळे उद्दिष्ट गाठण्यास प्रशासनाला अपयश आले. गतवर्षी महसूल विभागाने डिसेंबर 2020 अखेर पावणेसात कोटी रुपयांची (55 टक्के) महसूल वसुली केली आहे. आता मार्च 2021 अखेरपर्यंत शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान महसूल विभागासमोर उभे राहिले आहे.

दरम्यान, यावर्षी दि. 19 जानेवारीला त्यांचे वाळूसाठ्यांचे इ-लिलाव होणार आहेत. त्यामध्ये राहुरी तालुक्यातील मुळा व प्रवरा नदीपात्रातील सहा वाळूसाठे यांचा समावेश आहे. या लिलावातून महसूल विभागाला मोठा महसूल मिळणार आहे. मात्र, या लिलावासाठी वाळू ठेकेदारांचा लिलावातील जाचक अटी व चोरटी वाळू वाहतूक आणि त्याला मिळणारे कथित महसूल, पोलीस व राजकीय अभय, यामुळे राहुरी तालुक्याच्या महसूल विभागाच्या वाळू लिलावाकडे व महसूल वसुलीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राहुरी तालुका महसूल विभागाला मागील वर्षी 2019-20 अखेर 11 कोटी रुपये अर्थात (100 टक्के) व त्याहीपेक्षा अधिक वसुली वसुली करण्यात आली होती. मार्च 2020 पासूनच्या काळात जागतिक करोना महामारीचे मोठे संकट राहुरीसह सर्वत्र होते. सात ते आठ महिने लॉकडाऊन झाला. त्याचा परिणाम आर्थिक कृषी व अन्य ठिकाणी दिसून आला. परिणामी महसूल वसुलीवर त्याचा मोठा परिणाम झाला. तो राहुरीतही दिसला. ऑक्टोबर 2020 पासून सगळीकडे विकासाची गाडी पुन्हा रुळावर येण्याचे संकेत दिसत आहेत.

राहुरी तालुक्यात 31 डिसेंबर 2020 अखेर महसूल वसुली 6 कोटी 63 लाख रुपये अर्थात (55 टक्के )पूर्ण झाली. अवैध वाळूवाहतूक प्रकरणी 34 वाहनांवर या विभागाकडून कारवाई करण्यात आली. त्यात एकूण 50 लाख 80 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. अवैध वाळू वाहतूक व्यतिरिक्त अकरा वाहनांवर 15 लाख रुपयांची दंड वसुली महसूल विभागाच्या गौणखनिज विभागाकडून करण्यात आली. शिक्षण करवसुली 55 लाख 60 हजार रुपये अर्थात (75 टक्के ) वसुली करण्यात आली. जमीन वसुलीत तीन कोटी चाळीस लाख रुपये उद्दिष्ट दिलेले असताना राहुरी महसूल विभागाने 2020 अखेर 63 लाख 20 हजार रुपये अर्थात (20 टक्के ) वसुली केल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले.

एकंदरीत राहुरी महसूल विभागाला अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने या वर्षात 12 कोटी रुपये महसूल उद्दिष्टे दि.31 मार्च 2021 अखेर दिलेले असून डिसेंबर अखेर 55 टक्के अर्थात पावणेसात कोटी रुपयांची वसुली झाली आहे.