चोरलेली दुचाकी पुन्हा मालकाला विकण्याचा फंडा

राहुरीत चोराची यथेच्छ धुलाई ; साथीदारांचा तपास सुरू
चोरलेली दुचाकी पुन्हा मालकाला विकण्याचा फंडा

राहुरी (प्रतिनिधी) / Rahuri - राहुरी शहरहद्दीतून मोटारसायकल चोरून नंतर मोटारसायकल परत करण्यासाठी हजारो रुपयांची मागणी करणार्‍या अनिस सय्यद याला दि. 8 जुलै रोजी माजी नगरसेवक अशोक तनपुरे यांनी रंगेहाथ पकडून यथेच्छ धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी अनिस सय्यद याच्याबरोबर आणखी काही साथीदार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

रवींद्र अशोक रोडे हा जालना जिल्ह्यातील तरुण सध्या नोकरीनिमित्त राहुरी शहरात भाडोत्री राहत आहे. दि. 7 जुलै रोजी रात्री त्याने त्याची एच एफ डिलक्स क्र. एमएच 21 बीएन 9335 ही मोटारसायकल तनपुरे यांच्या घराजवळील पार्किगमध्ये लावली होती. रात्रीच्या दरम्यान ती मोटारसायकल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली. दुसर्‍या दिवशी मोटारसायकल मालक रोडे याला अनोळखी नंबरवरून फोन आला.

मोटारसायकल परत पाहिजे असेल तर 15 हजार रुपये द्यावे लागतील. रोख रक्कम घेऊन स्टेट बँकेजवळ ये, असे सांगितले. रोडे याने त्वरित तनपुरे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी काही तरुण बरोबर घेऊन स्टेट बँकेसमोर त्या तरुणाचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याची यथेच्छ धुलाई करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

रोडे याच्या फिर्यादीवरून अनिस नजीर सय्यद राहणार चिस्तीया मस्जिदजवळ, बुरुड गल्ली राहुरी याच्यावर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक कारेगावकर हे करीत आहेत. अनिस सय्यद याला काल न्यायालयासमोर हजर केले असता त्याचा जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळाली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com