राहुरी तालुक्यात रोहिणीचा तुरळक शिडकावा, मृगाने दाखविला अंगठा

राहुरी तालुक्यात रोहिणीचा तुरळक शिडकावा, मृगाने दाखविला अंगठा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

रोहिणी नक्षत्राच्या तुरळक हजेरीनंतर राहुरी तालुक्याला मृग नक्षत्रानेही अंगठा दाखविला. मृग नक्षत्र सुरू होऊन आठवड्याचा कालावधी उलटला. मात्र, राहुरी तालुक्यात पेरणीलायक दमदार पाऊस झाला नाही. दरम्यान, शेतकर्‍यांच्या पेरणीला वेग आला आहे. काही ठिकाणी पेरण्या पूर्ण होऊन खरिपाची पिके उतरून आलेली असून ती दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्याने पेरलेले उगवतं की नाही? की दुबार पेरणी करावी लागेल? या चिंतेत शेतकरी पडले आहेत.

दरम्यान, पावसाने ओढ दिली तर खरीप हंगाम धोक्यात येणार असल्याचे संकेत असून शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असल्याची भिती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

रोहिणी नक्षत्राचा तुरळक शिडकावा राहुरी तालुक्यात पडला. त्यानंतर राहुरी तालुक्यात हमखास बरसणार्‍या मृग नक्षत्राने आठवडा उलटून गेला तरी पाठ फिरविली. त्यामुळे आता उतरून आलेल्या पिकांना दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे. आगास पेरणीची पिके तुरळक पावसाने तरारून वर आली.

मात्र, आता पावसात व्यत्यय आल्याने अनेक पिकांनी माना टाकल्या आहेत. यावर पर्याय म्हणून राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी आता भंडारदरा उजव्या कालव्यातून तर मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून आवर्तनाची मागणी केली आहे. राहुरी तालुक्यात भंडारदरा व मुळा धरणाचे आवर्तन सोडले जाते. दोन्हीही धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे. पाऊस लांबल्याने आवर्तनाची मागणी वाढली आहे.

दि. 8 जून रोजी मृग नक्षत्रास प्रारंभ झाला. तर दि. 21 जून रोजी आर्द्रा नक्षत्र सुरू होणार आहे. मृग नक्षत्र संपण्यासाठी आता अवघ्या चारच दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. मृग नक्षत्राचा राहुरी तालुुक्यातील शेतकर्‍यांना काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे आता शेतकर्‍यांनी तातडीच्या आवर्तनाची प्रतिक्षा चालविली आहे. तर आगामी चार दिवसानंतर सुरू होणार्‍या आर्द्रा नक्षत्रावर शेतकर्‍यांची भिस्त राहणार आहे. अन्यथा पेरलेले उगवत की नाही? की दुबार पेरणी करावी लागणार? या धास्तीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

यंदा 30 हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राहुरी तालुक्यात खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सोयाबीन, कपाशी, कांदा आदी पिकांच्या पेरण्या आणि लागवडी सुरू आहेत. तर काही ठिकाणी पावसाच्या भरवशावर आगास पेरण्या झाल्या आहेत. मात्र, त्यावर आता पावसाची अवकृपा झाली असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी मान्सुन सक्रिय होऊन सरासरीच्या 98 टक्के पावसाचा अंदाज राहुरी तालुक्यात व्यक्त करण्यात आला आहे. तर मुळा धरणही पुन्हा पूर्ण क्षमतेने भरणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने यंदा कांदा आणि उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, त्यासाठी आता दमदार नव्हे तर ‘कोसळधार’ पावसाची अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

यंदा करोना महामारीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले आहेत. शेतमालाला कवडीमोल भाव मिळाल्याने सध्या शेतकरी अत्यंत अडचणीत आलेले आहेत. त्यातच इंधन दर वाढल्याने यंत्राच्या सहाय्याने शेती करणे जिकिरीचे झाले आहे. मशागत आणि पेरणीसाठी ट्रॅक्टरचालकांनी दर वाढविल्याने राहुरी तालुक्यात अनेक शेतकर्‍यांनी आपली पारंपरिक असलेल्या सर्जाराजाची जोडी नांगराला जुपून नांगरट व पेरण्या केल्या. आता एवढी कसरत करून सोळा आणे पीक आले पाहिजे, अशी माफक अपेक्षा बळिराजाने व्यक्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com