देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

शेतकर्यांना कृषीपंपाचे अव्वाचे सव्वा वीजबिल पाठविल्यानंतर काल रविवार दि.7 फेब्रुवारीपासून परिसरात

दोन तासाचे वीजभारनियमन सुरु करुन महावितरणने शेतकर्यांना शॉक दिला आहे. उन्हाळा सुरु होण्याआधीच भारनियमन सुरु झाल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दोन दिवसापूर्वी महावितरणने परिसरातील शेतकर्यांना शेतीपंपाच्या वीजबिलाचे वाटप केले. यामध्ये तीन अश्वशक्तीच्या पंपाला पंचावन्न ते साठ हजाराचे तर पाच अश्वशक्तीच्या पंपाला लाखाच्या पुढे वीजबिल देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या वीजबिलाची मुदत नोव्हेंबरमध्येच संपलेली असून फेब्रुवारीमध्ये शेतकर्यांना वीजबिल देण्यात आले आहे. बिल हातात पडल्यानंतर बिलाची रक्कम पाहून अनेकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. हे थोडे होते, म्हणून की काय, कालपासून दोन तास वीजभारनियमन सुरु करण्यात आले आहे. यामुळे शेतकर्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.

सध्या शेतात कांदा, गहू, हरभरा, ऊस ही पिके उभी आहेत. उन्हाळा तोंडावर आहे. सध्या अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने वीजपंप चालत नाहीत. त्यामुळे भरणे उरकत नाही. या आठवड्यात थंडी पुन्हा वाढल्याने रात्री-अपरात्री पाणी भरण्यासाठी शेतात जावे लागते. त्यातच बिबट्याची दहशत असल्याने मोठ्या धाडसाने शेतीला पाणी भरावे लागत आहे. त्यातच वाढीव वीजबिलानंतर वीजभारनियमन सुरु झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची घोषणा केली होती. पण दुर्दैवाने याची अंमलबजावणी झाली नाही. आता तर शेतकर्यांना वाढीव वीजबिल देण्यात आले असतानाच भारनियमन सुरु करण्यात आले आहे. आधी वीज पूर्णदाबाने देण्यात यावी व नंतरच भारनियमनचा विचार करावा, अशी मागणी मंत्री तनपुरे यांना शेतकर्यांनी केली आहे.