राहुरी पोलीस ठाण्यावर सोमवारी रिपाइंचा मोर्चा - थोरात

टाकळीमिया स्मारक वाद प्रकरण
File Photo
File Photo

राहुरी फॅक्टरी |वार्ताहर| Rahuri Factory

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे ग्रामसभेत महापुरुषांच्या स्मारकावरून वाद निर्माण झाला. या घटनेच्या निषेधार्थ आरपीआयच्या वतीने सोमवार दि. 7 मार्च रोजी राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

गेल्या दोन दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचेही स्मारक उभारावे, असा मुद्दा एका महिलेने मांडला. तिला विरोध करून गावातील 5 लोकांनी मारहाण करून विनयभंग केला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान टाकळीमिया प्रकरणात राहुरी येथे झालेल्या मोर्चात ही महिला समाजकंटक असून तिला तालुक्याबाहेर काढा, अशी मागणी काही मोर्चेकर्‍यांनी केली.

त्याचा तीव्र शब्दांत थोरात यांनी निषेध व्यक्त केला. थोरात म्हणाले, या महिलेला ग्रामसभेत मारहाण झालेली नसेल तर तिची पक्षातून हकालपट्टी केली जाईल. आम्हीसुद्धा आमच्या सर्व पदाचे राजीनामे देऊ, असेही थोरात यांनी स्पष्ट केले. उलट पीडित महिलेच्या पतीवर दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केला असून तो गुन्हा मागे घ्यावा, या सर्व घटनेच्या निषेधार्थ सोमवार 7 मार्च रोजी आरपीआय आठवले गटाच्यावतीने राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष थोरात यांनी सांगितले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे, उपतालुकाध्यक्ष सुनील चांदणे, प्रदीप भोसले, अतुल त्रिभुवन, बाळासाहेब पडागळे, संजय गिरी, माऊली भागवत, कुमार भिंगारे, गणेश ओहळ, मयूर कदम, सुरेश लोखंडे, नवीन साळवे, नंदू सांगळे, सुभाष गायकवाड, भाऊसाहेब दिवे, महिला जिल्हाध्यक्षा सीमा बोरुडे, महिला राहुरी तालुका उपअध्यक्ष छाया दुशिंग, प्रियंका सगळगिळे, उषा सगळगिळे, निलम सगळगिळे, मंगल बारसे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com