
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
पोलीस ठाण्याच्या आवारात एक पुरूष व दोन महिलांनी आपसात मोठमोठ्याने आरडा ओरडा करुन हाणामारी केली. तसेच परिसराची शांतता भंग केली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसील कार्यालयाच्या आवारात पोलीस ठाण्यासमोर काही महिला व पुरूष हे अचानक एकमेकांवर आरडा ओरडा करुन मारामारी करु लागले. तेव्हा पाहणार्यांची गर्दी जमा होवून वादविवाद सुरु झाला. त्यावेळी हवालदार अमोल पडोळे व इतर काही पोलीस कर्मचारी हे भांडण सोडवून त्यांना आपसात भांडण करु नका. असे समजावुन सांगीतले. तरी देखील त्यांचे भांडण सुरूच होते.
अखेर पोलीस कर्मचार्यांनी त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली. त्यांना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे समोर हजर करुन पुन्हा वाद होऊ नये म्हणून दीपक बबन लाटे याला चौकशी करीता घेवून जात असताना आरोपी दीपक लाटे याने चौकशी करीता नकार देत हवालदार सोमनाथ जायभाय यांना जोराचा धक्का मारुन तेथून पळुन गेला. या घटनेत हवालदार सोमनाथ जायभाय हे खाली पडल्याने त्यांना दुखापत झाली.
हवालदार सोमनाथ भगवान जायभाय यांच्या फिर्यादीवरून आरोपी दीपक बबन लाटे, राहणार चिंचोली, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 1271/2022 भादंवि कलम 332, 353 प्रमाणे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा करीत आहेत. पसार झालेला आरोपी दीपक लाटे याचा शोध सुरू आहे. तसेच हवालदार अमोल अशोक पडोळे यांच्या फिर्यादीवरून सविता संजय काळे, वंदना अनिल बुरुगुडे, दीपक बबन लाटे तिघे राहणार चिंचोली, ता. राहुरी. यांच्यावर गुन्हा रजि. नं. 1270/2022 भादंवि कलम 160 प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी आप-आपसात भांडण करून शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक शिवाजी खरात करीत आहेत.