राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील एका गावात आपल्या आजी आजोबांच्या घरी आलेल्या अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे

जबरदस्तीने शारिरीक अत्याचार केल्याची घटना डिसेंबर 2020 दरम्यान घडली आहे. पीडीत मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. कोपरगाव पोलीस ठाण्यातून आलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

कोपरगाव तालुक्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांनी दिवाळीसाठी तिच्या आजी आजोबाकडे राहुरी येथे पाठविले होते. तेव्हापासून ती मुलगी राहुरीत आजी आजोबांबरोबर राहत होती. सन 2020 साली डिसेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसर्या आठवड्यात अल्पवयीन मुलगी ही घराच्या ओट्यावर रात्रीच्या वेळी एकटीच झोपली असताना आरोपी बाळासाहेब रोकडे याने तिच्यावर जबरदस्ती करून शारिरीक अत्याचार केला.

तसेच कोणाला काही सांगितले तर तुला मारहाण करीन, अशी धमकी देऊन वारंवार शारिरीक अत्याचार केला. गेल्या आठवड्यात पीडीत मुलगी तिच्या आई वडिलांच्या घरी कोपरगाव येथे गेली. दरम्यान तिला त्रास होऊ लागल्याने ती गरोदर राहिल्याचे समजले. तिच्या आई-वडिलांनी ताबडतोब कोपरगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली.

ती फिर्याद राहुरी पोलीस ठाण्यात प्राप्त झाली. त्यानुसार आरोपी बाळासाहेब भानुदास रोकडे राहणार सोनगांव सात्रळ, ता. राहुरी याच्या विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून गजाआड केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ करीत आहेत.