राहुरी तालुक्यात विवाह सोहळ्यांना परवानगी बंधनकारक

प्रशासन आदेश जारी; अन्यथा लग्नाच्या बेडीऐवजी पोलिसांची बेडी पडणार
राहुरी तालुक्यात विवाह सोहळ्यांना परवानगी बंधनकारक

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

शुभमंगल सावधान होण्यापूर्वीच आता वधू-वरांना अनलॉकमध्ये घालून दिलेल्या शासकीय नियमांबाबत सावधानता बाळगावी लागणार आहे. अन्यथा पोलिसांच्या परवानगीविना होणार्‍या विवाह सोहळ्यात आता लग्नाच्या बेडीऐवजी पोलिसांच्या बेडीत अडकावे लागणार आहे. मागील आठवड्यात कनगर येथे झालेल्या विवाह सोहळ्यात वधू-वरांसह तब्बल 23 जण करोनाबाधित झाल्याने प्रशासनाने राहुरी तालुक्यात हा आदेश जारी केला आहे.

राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात विवाह समारंभ अथवा इतर कार्यक्रमांसाठी पोलीस ठाण्याची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचा आदेश पारीत केला आहे.

करोना पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन शिथील करण्यात आले असले तरी प्रशासनाकडून काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.तरीही ग्रामपंचायत व नगर पालिका हद्दीत विवाह समारंभ होत आहेत. जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त व्यक्ती लग्न समारंभास उपस्थित राहत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात लग्न समारंभात नियमानुसार पोलीस ठाण्याची परवानगी असेल तरच लग्नांना परवानगी द्यावी.परवानगी नसल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा सन 2005 मधील तरतुदीनुसार कारवाई करावी, असे तहसीलदार शेख यांनी आदेशात म्हटले आहे.

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात परवानगी देण्यात आलेल्या लग्न समारंभास नियमानुसार योग्य तो पोलीस बंदोबस्त द्यावा, विनापरवाना लग्न सभारंभ होणार नाही, याबाबत गावातील पोलीस पाटील यांनी खबरदारी घ्यावी, तशा सूचना द्याव्यात, असेही तहसीलदार शेख यांनी आदेशात म्हटले आहे.

दरम्यान राहुरी तालुक्यातील कनगर येथे गेल्या 5 ते 6 दिवसांपूर्वी एका वस्तीवर विवाह समारंभ संपन्न झाला असता नवरदेवासह जवळपास 30 पेक्षा जास्त व्यक्ती करोना बाधित निघाले असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून या विवाह समारंभानंतर तहसीलदार यांनी परवानगी बंधनकारक केली आहे. विना परवाना लग्न व इतर समारंभ होत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तात्काळ समारंभाच्या ठिकाणी जाऊन संबंधित लग्न समारंभातील नवरदेव, नवरीसह दोघांचे पालक यांच्याविरुद्ध गुन्हा करावा. ग्रामपंचायत व नगरपालिका हद्दीतील नागरिकांनी लग्न व इतर समारंभ करण्यापूर्वी परवागी घ्यावी, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com