
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) संभाव्य जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समिती (Panchayat Samiti) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी पंचायत समितीची (Rahuri Panchayat Samiti) बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. नगरपालिका निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समितीच्या आरक्षणाकडे (Panchayat Samiti Reservation) तालुक्यातील अनेक इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. काल आरक्षणाची घोषणा होताच काही इच्छुकांचा हिरमोड झाला तर काही इच्छुकांना सत्तेची लॉटरी लागणार असल्याचे अधोरेखित झाले आहे. आज येथील तहसील कार्यालयात (Tahsil Office) हे पंचायत समितीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी आरक्षण जाणून घेण्यासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुतांशी इच्छुकांनी हजेरी लावली.
तर राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) सहा जि.प. गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात वांबोरी सर्वसाधारण, सात्रळ नागरिकांचा मागास प्रवर्ग, उंबरे नागरिकांचा मागास प्रवर्ग, बारागाव नांदूर अनुसूचित जमाती, टाकळीमिया सर्वसाधारण महिला, गुहा नागरिकांचा मागास प्रवर्ग असे गटनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे येथेही काही इच्छुकांचे स्वप्न भंगले तर काहींना सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, राहुरी पंचायत समितीत पूर्वी 10 गण होते. आता उंबरे व मानोरी असे दोन गण पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आल्याने आता एकूण 12 गण झाले आहेत. त्यात कोल्हार, सात्रळ, मांजरी, गुहा व ताहाराबाद हे गण खुले झाल्याने तेथील इच्छुकांच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत. तर ब्राम्हणी गणात सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने तेथील इच्छुक कारभारी आता आपल्या कारभारणीसाठी जोरदार फिल्डींग लावणार आहेत. पंचायत समितीत एकूण 12 जागेपैकी सहा महिलांना म्हणजे सत्तेत पन्नास टक्के वाटा मिळून जाण्याची संधी मिळणार आहे.
राहुरीतील गणनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे -
कोल्हार खु. गण - सर्वसाधारण
सात्रळ गण - सर्वसाधारण,
मांजरी गण - सर्वसाधारण,
टाकळीमिया गण - अनुसूचित जाती महिला,
उंबरे गण - अनुसूचित जाती व्यक्ती
मानोरी गण - अनुसूचित जमाती महिला
वांबोरी गण - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब्राम्हणी गण - सर्वसाधारण महिला
गुहा गण - सर्वसाधारण महिला
ताहाराबाद गण - सर्वसाधारण,
बारागाव नांदूर गण - नागरिकांचा मागास प्रवर्ग
राहुरी खुर्द गण - नागरिकांचा मागास प्रवर्ग
असे गणनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुक कामाला लागले आहेत.