राहुरी तालुक्यात मुळा-प्रवरातून वाळूचा बेकायदा उपसा

महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष; वाळू व मुरूमाची तस्करी वाढली
File Photo
File Photo

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

सध्या मुळा आणि प्रवरा दोन्ही नद्यांमध्ये पाणी आहे. त्यामुळे वाळूला सोन्याचे मोल आले आहेए. तर वाळूतस्करांची चांदी झाली आहे.

हे सर्व होत असताना राहुरी तालुक्याचा महसूल विभाग मूग गिळून गप्प असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर राहुरी फॅक्टरी येथून मुरूमाचे मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन होत असून संबंधित मुरूम तस्करांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, महसूल खात्याचे वाळू तस्करीकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाच्या अधिकृत ठेक्यांकडे ठेकेदाराने पाठ फिरविली आहे. राहुरी महसूल प्रशासनाचे वाळू तस्करांबरोबर आर्थिक लागेबांधे असल्याने तस्करी जोमात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकूल योजनेची घरे व इतरही इमारतींचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. परंतु मुळा व प्रवरा दोन्ही नद्याचा पाण्याचा फुगवटा अद्याप उतरला नसल्याने वाळू मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे वाळूला सोन्याचे मोल आले आहे. याचाच नेमका फायदा वाळूतस्करांनी महसूल व पोलीस यंत्रणा हाताशी धरुन पुन्हा डोके वर काढले आहे. एक ब्रास वाळू साडेचार ते सहाहजार रुपयेपर्यंत विकली जात असल्याने वाळूतस्करांची चांदी झाली आहे.

वाळूचे भाव तेजीत असल्याने वाळूतस्कर पाण्यामधून खुसकीच्या मार्गाने वाळू नदीबाहेर काढत आहेत. काही तस्कर दिवसभर वाळू बाहेर काढून रात्री वाहतूक करतात. ज्या माणसाला वाळू पाहिजे असेल त्याच्या घरी रात्री अपरात्री किंवा पहाटे वाळू टाकली जात आहे. वाळू टाकल्याबरोबर रोख रक्कम हातात घेतली जात आहे.

अशाप्रकारे वाळूचे दर अव्वाच्या सव्वा झाल्याने शासनाने घरकूल योजना राबवूनही गरीबांचे घरकुलाचे स्वप्न अधूरे राहण्याची शक्यता आहे. हे सर्व समजण्या इतकी महसूल यंत्रणा नक्कीच दुधखुळी नाही. परंतु अर्थपूर्ण तडजोड व हप्ता संस्कृतीमुळे जो तो मूग गिळून हाताची घडी व तोंडावर बोट ठेऊन आहे. याबाबत जिल्हाधिकारी भोसले यांनी लक्ष घालून वाळूतस्करीच्या गोरखधंद्याला आळा घालण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.

अनेक वाळूतस्करांनी अनेक ठिकाणी अवैध वाळूचा अवैध साठा केलेला आहे. हाच साठा आता प्रचंड भावाने विकला जात आहे. एक ब्रास वाळूचे सहा ते सातहजार वसूल केले जात आहेत. वाळू विक्रीसाठी गावात एजंट नेमले आहेत. हे दलाल जिथं जिथं घराचे काम सुरू आहे, त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांना पहाटे-पहाटे वाळू टाकत आहेत. वाळूतस्करांचे खबर्‍यापासून दलालापर्यंत मोठे रॅकेट असून हे रॅकेट उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे. तसेच घरकुल योजनेतील घरकुल बांधण्यासाठी तहसीलदार यांनी गरजेप्रमाणे परवाना देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com