राहुरीच्या मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात यंदा पुन्हा होणार आवर्तनाची कपात

फक्त तीनच आवर्तने देण्यात येणार; दिवाळसणानंतर कालवा सल्लागार समितीची बैठक
राहुरीच्या मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात यंदा पुन्हा होणार आवर्तनाची कपात

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

अतिवृष्टीमुळे राहुरी तालुक्यातील खरीप हंगाम काढणीच्या अंतिम टप्प्यात असतानाच पाण्यात गेला.

त्यामुळे शेतकर्‍यांना खरीप हंगामातील पिकांवर पाणी सोडावे लागले. आता रब्बीची चाहूल लागली आहे. रब्बीच्या मशागतीही सुरू झाल्या आहेत. सध्या मुळा धरण ‘हाऊसफुल्ल’ झालेले आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी मुळा धरणातील कालव्यांतूनच आवर्तनाचे नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी दिवाळसणानंतर बैठकीचे नियोजन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, यावर्षी पुन्हा राहुरी तालुक्यातील लाभक्षेत्रात मुळा धरणाच्या आवर्तनातून कपात करण्याचे धोरण आखले असल्याची चर्चा आहे. तीन आवर्तने देऊन शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्यात येणार आहेत. रब्बीचे नियोजन मुळाच्या आवर्तनावरच होणार असून एकूण रब्बी हंगामासाठी मुळा धरणातून तीन आवर्तने देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असताना ही तीन आवर्तने रब्बी हंगामासाठी अपुरे असल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

जानेवारीनंतर जसजशी उन्हाची तिव्रता वाढते, तसतशी पिकांना पाण्याची जादा गरज वाढत असल्याने किमान चार आवर्तने देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. तीन आवर्तनानंतर पुन्हा राहुरीच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातून आवर्तनाची मागणी वाढते. नंतर आवर्तनाअभावी रब्बीच्या पिकांना अंतिम टप्प्यात फटका बसून उत्पादनात घट होत असल्याचे शेतकर्‍यांनी म्हटले आहे.

यावर्षीही 26 हजार दलघफूट क्षमतेच्या मुळा धरणामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यातच आता मुळा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची गरज भासणार नसल्याने राहुरीच्या लाभक्षेत्रात यंदा पिकांना पुरेसे पाणी देण्याची मागणी आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामात मुळा लाभधारक शेतकर्‍यांना 15 टिएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. रब्बी हंगामात 3 आवर्तने मिळण्याची शक्यता पाटबंधारे सुत्रांनी व्यक्त केली असून आता मुळा धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीकडे शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या आहेत.

राहुरी तालुक्यात दरवर्षी कृषी विभागाकडून रब्बी हंगामासाठी 24 हजार 447 हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले जाते. दरम्यान, राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांना यंदा मुळा व भंडारदरा पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने पाण्याची शाश्वती निर्माण झाली. मागील दोन वर्षांपूर्वी उसाचे आगार असलेल्या राहुरी तालुक्यात कांदा व भाजीपाला, चारा पिकांची विक्रमी लागवड होऊन ऊस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली होती.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून पावसाची मेहेरबानी झाल्यानंतर यावर्षी धरणाच्या पाणलोटक्षेत्रासह लाभक्षेत्रालाही अतिवृष्टीचा दणका बसला. यंदाच्या मान्सून हंगामात गेल्या चार ते पाच वर्षांचा पावसाचा तुटवडा भरून निघाला. तालुक्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात विश्वास निर्माण होऊन खरीप हंगामानंतर रब्बीतही लागवडीला जोर मिळत असल्याचे दिसून येत आहे.

ज्वारी, गहू, मका, करडई, जवस, तीळ, सुर्यफूल, कांदा, हरभरा पेरणीचा श्रीगणेशा झाला आहे. शेतकर्‍यांना मागील खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पंचनामे शासनदरबारी दाखल झालेले आहेत. याबाबत शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई तसेच कर्जमाफीकडे शेतकर्‍यांची नजर लागलेली आहे. यावर्षी पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगामातील पेरण्यांमध्ये ऊस क्षेत्रात झपाट्याने वाढ होत असून सद्यस्थितीला कांदा दर पाहता शेतकर्‍यांचा कांदा लागवडीकडे पुन्हा कल वाढला आहे.

दरम्यान, शेतकर्‍यांना रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुळा कालवा सल्लागार समितीची बैठक अजूनही झालेली नाही. मागील पाच वर्षांपूर्वी कालवा सल्लागार समितीवर तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींचा वरचष्मा असायचा. त्यामुळे धरणातील आवर्तनाच्या चाव्या स्थानिक आमदारांकडेच होत्या. मात्र, आता धरणाचे आवर्तन सोडण्याच्या चाव्या थेट मंत्रालयात गेल्याने आता आवर्तनात कपात करण्यात येते.

मुळा धरणामध्ये 26 हजार दलघफू इतका पूर्ण क्षमतेने पाणीसाठा आहे. त्यापैकी 15 हजार दलघफू पाणी रब्बी आवर्तनासाठी निश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने शेतकर्‍यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे रब्बी हंगामात 3 आवर्तने लाभल्यास मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावर आधारित शेतकर्‍यांना मोठा लाभ होणार आहे.

राहुरी तालुक्यात सुमारे 12 हजार हेक्टर क्षेत्रावर जिल्ह्यातील तब्बल 12 साखर कारखान्यांकडून ऊस तोडणी सुरू झालेली आहे. ऊस तोडणी होताच रान मोकळे होऊन रब्बी लागवडीला वेग येणार आहे.

राहुरी, नेवासा, शेवगाव या तिन्ही मतदारसंघातील लोकप्रतिनिधी सदस्य असलेल्या कालवा सल्लागार समितीची बैठक दिवाळसणानंतर होणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाने दिली. धरणात पाणी असल्याने आता आवर्तनात कपात न करता रब्बी हंगामासाठी पूर्ण चार आवर्तने देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com