राहुरी : थकबाकीमुळे महावितरणची वीज तोड मोहीम जोरात

ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा कोमात ; पथदिवे बंद, पाणीपुरवठा विस्कळीत
राहुरी : थकबाकीमुळे महावितरणची वीज तोड मोहीम जोरात

उंबरे (वार्ताहर) / Umbare - लॉकडाऊनच्या काळात वीजबिलाचा आर्थिकभार मोठ्या प्रमाणात वाढल्याने महावितरणने आता वसुलीसाठी राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायतींची वीजतोड मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे महावितरणच्या वसुलीचा ‘शॉक’ राहुरी तालुक्यातील काही ग्रामपंचायतींना बसला आहे. अनेक ग्रामपंचायतींचे वीज कनेक्शन खंडीत करण्यात आल्याने अनेक गावांवर अंधाराचे सावट निर्माण झाले असून विजेअभावी पाणीपुरवठाही विस्कळीत झाल्याने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे.

दरम्यान, राज्याचे उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी याप्रश्‍नी लक्ष घालून तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी राहुरी पंचायत समितीचे सदस्य सुरेश बानकर यांनी केली आहे. महावितरणने ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन खंडीत करू नये, थकीत वीजबिलातील 50 टक्के रक्कम माफ करून उर्वरित 50 टक्के रक्कम हप्त्याहप्त्याने वसूल करावी, यासाठी ना. तनपुरे यांनी संबंधित महावितरणाला आदेश द्यावेत, अशीही मागणी बानकर यांनी केली आहे.

राहुरी तालुक्यात सध्या विजबिलाच्या थकबाकीत असलेल्या ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन खंडीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. काही ग्रामपंचायतींना या वसुलीचा चांगलाच शॉक बसला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गोत्यात आला असून पथदिवेही बंद झाल्याने काही गावे अंधारात बुडाली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पंधराव्या केेंद्रीय वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनांची व पथदिव्यांची विद्युत देयके अदा करण्याचे आदेश राज्य शासनाने शासकीय अध्यादेशात जारी केले आहेत. वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानातून पथदिव्यांनी देयके व बंधित अनुदानातून पाणीपुरवठा योजनांची वीज देयके ग्रामपंचायत स्तरावर अदा करण्यात येणार असल्याचे या शासकीय अध्यादेशात म्हटले आहे. मात्र, यावर तोडगा न काढताच संबंधित महावितरणचे अधिकारी सर्रास ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन खंडीत करून ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीला वेठीस धरीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

राहुरी तालुक्यात ग्रामपंचायतींकडे विजबिलापोटी दोन कोटी 80 लाख 69 हजार रुपये एवढी विजेची थकबाकी आहे. त्यासाठी महावितरणचा वसुलीसाठी आटापिटा सुरू आहे. वसुलीसाठी महावितरणने राहुरी पंचायत समिती प्रशासनाला संबंधित ग्रामपंचायतींनी पथदिवे व पाणीपुरवठा देयके थकबाकी भरण्यासाठी पत्राद्वारे गळ घातली आहे. त्यावरून संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी ग्रामपंचायतींना विजबिल भरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या अनेक ग्रामपंचायतींच्या तिजोरीतही खडखडाट असल्याने गटविकास अधिकार्‍यांच्या आदेशाला ग्रामपंचायत प्रशासन किती प्रतिसाद देईल? यावरच आता बंद पडलेला पाणीपुरवठा आणि पथदिव्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

महावितरणने आता ग्रामपंचायतींवर कायदेशीर कारवाई करण्याचे व वीज कनेक्शन करण्याचे हत्यार उपसल्याने आता ग्रामपंचायतींवरही पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. त्यासाठी आता ग्रामपंचायतींनाही ग्रामस्थांकडील थकबाकीसाठी कटू निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. थकबाकीदार ग्रामस्थांमुळे नियमित पट्टी भरणार्‍या ग्रामस्थांनाही खंडीत विजेची झळ बसणार आहे.

राज्य शासनाच्या 14 व्या वित्त आयोगातून विजबिलापोटी ग्रामपंचायतींची 25 टक्के रक्कम दोन वर्षापूर्वी परस्पर कपात केली आहे. मात्र, या रकमेचा कोणताही हिशोब महावितरण व जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला दिला नाही. त्यामुळे विजदेयके न भरल्याने वीज कनेक्शन खंडीत करण्यात आल्याचे समजते.

लॉकडाऊनमुळे महावितरण गोत्यात आलेले आहे. वीज ग्राहकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र, तरीही महावितरणने करोना महामारीत अविरत सेवा दिली आहे. ओव्हर ड्राफ्टची मर्यादाही संपल्याने आता महावितरणकडे थकबाकीची वसुली करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याची कबुली संबंधित अधिकार्‍यांनी दिली. थकबाकीसाठी कठोर निर्णय घेण्याशिवाय पर्याय नाही. वीजपुरवठा खंडीत करून वीज ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा कटू निर्णय घ्यावा लागणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

दरम्यान, तालुक्यातील काही कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचयतींना पंधराव्या वित्त आयोगातून अत्यंत कमी प्रमाणात विकास निधी मिळतो. या निधीतून विकास कामे करायची की, विजबिल भरायचे? असा संभ्रम आता ग्रामपंचायत प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com