बाजार समितीच्या मुदतवाढीसाठी जो न्याय प्राजक्त तनपुरेंना, तोच समान न्याय सुजय विखेंना द्या

राहुरीच्या मेळाव्यात आवाहन
बाजार समितीच्या मुदतवाढीसाठी जो न्याय प्राजक्त तनपुरेंना, तोच समान न्याय सुजय विखेंना द्या

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

डॉ. तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीऐवजी हा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी राज्य शासनाने राहुरी बाजार समितीला ज्या कायद्यानुसार मुदतवाढ दिली, तोच कायदा डॉ. तनपुरे कारखान्याच्या बाबतीत लावून संचालक मंडळाला राज्य शासनाने मुदतवाढ द्यावी, म्हणजे कारखाना सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल, जो न्याय प्राजक्त तनपुरेंना दिला, तोच समान न्याय सुजय विखेंना द्या, असे आवाहन करतानाच निवडणूक घ्यायची असेल तर ती काही महिने आधी घ्या, अशी मागणी आम्हीच निवडणूक आयोगाकडे केली होती. असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी येथील शेतकरी सभासदांच्या मेळाव्यामध्ये केले.

दरम्यान, कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता आम्ही तीन हंगाम पार केले आहेत. कोणीही कर्ज न घेता एक हंगाम चालू करून दाखवा, मी खासदारकीचा राजीनामा देईल. कामगार व सभासदांवर आम्ही नेहमी प्रेम केले आहे. त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मात्र, कामगारांचे सध्या आंदोलन सुरू आहे. त्यास काहीजण पाठिंबा देत आहेत. ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांना संचालक करून कारखाना चालत असेल तर आमची आजही राजीनामा देण्याची तयारी आहे. कोणीही कामगार व सभासद तसेच इतर देणे देण्याची तयारी दर्शविल्यास तसा प्रस्ताव आमच्याकडे आठ दिवसांत दिल्यास आम्ही त्यांना कारखाना चालवायला देऊ. असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा व शेतकर्‍यांचा मेळावा राहुरी येथील येथे माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे मार्गदर्शक तज्ज्ञ संचालक खा. डॉ. सुजय विखे, चेअरमन नामदेवराव ढोकणे, माजी चेअरमन व विद्यमान संचालक उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढुस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

प्रारंभी सभासद पंढरीनाथ पवार, दत्तात्रय आढाव, डॉ. धनंजय मेहेत्रे, कैलास पवार, चांगदेव भोंगळ, बाबासाहेब देशमुख आदी सभासदांनी सांगितले, क्षखा. सुजय विखे व शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. त्यामुळे यावर्षी निवडणूक होण्याऐवजी कारखाना सुरू करणे हे सभासद व शेतकरी तसेच कामगारांच्या हिताचे आहे. त्यामुळे शासनाने देखील मुदतवाढ देऊन कारखाना सुरू करण्याचा मार्ग मोकळा करावा, अन्यथा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

खा.डॉ. सुजय विखे यांनी सांगितले, तालुक्यामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. परिवर्तन मंडळाची भविष्यातील भूमिका काय असावी? यावर विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. हा कारखाना सुरू करण्यासाठी माझ्याबरोबरच माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत केली. म्हणून हा कारखाना सुरू होऊ शकला, अन्यथा ते शक्य नव्हते. सन 2019 मध्ये दुष्काळामुळे कारखाना बंद ठेवावा लागला. यावर्षी जर सहा लाख टन ऊस गाळप केला तर सर्वांची देणी आम्ही देऊ शकतो. अगोदर जुन्या लोकांनी केलेले पाप मी फेडतो आहे. विखे कुटुंबामध्ये देण्याची दानत आहे. आम्ही कामगारांचा पै ना पै देऊ, कारखान्याच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देता येत नाही. मग राहुरीच्या मार्केट कमिटीला सहा-सहा महिने अशी एक वर्ष मुदतवाढ कोणत्या कायद्याने राज्य शासनाने दिली? त्याच कायद्याने डॉ. तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळाला देखील मुदतवाढ दिली जावी. म्हणजे कारखाना सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. सत्ताधार्‍यांना एक कायदा व विरोधकांना वेगळा कायदा असे चालणार नाही. आम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा. कारखाना सुरू करण्यासाठी अनेकवेळा आम्ही स्वतः गुंतवणूक केली. राहुरी तालुक्याने मला भरभरून दिले आहे. आम्ही उपकार विसरणार नाही.

आम्हाला कोणी अडचणीत आणत असेल तर आम्ही साधे राजकारणी नाहीत, हे कोणी विसरू नये. ज्यांचे एक टिपूस देखील कारखान्याला आले नाही, ते आमच्यावर आरोप करीत आहेत. आम्ही हा कारखाना चालविण्यास कटिबद्ध आहोत. मात्र, सर्वांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. या कारखान्याचे खासगीकरण करण्याचा डाव कुणाचा असेल तर सर्वांची देणी दिल्याशिवाय खासगी व्यक्तीला आम्ही या कारखान्यात पाऊल देखील ठेवू देणार नाही.

माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले, काल मंत्र्यांनी मुदतवाढ मिळणार नाही, अशी घोषणा केली. मात्र, त्यांच्या हातात ज्या संस्था आहेत, त्यांना मुदतवाढ दिली जाते. मग तनपुरे कारखान्याला मुदतवाढ का नाही? असा सवाल त्यांनी केला. तनपुरे यांच्याकडे कारखान्याची सत्ता आली, त्यावेळी मोठ्या प्रमाणात साखर विक्रीसाठी शिल्लक होती. साखर विक्री झालेले पैसे जिल्हा बँकेला न भरल्याने कारखान्यावरचा बँकेचा बोजा वाढत गेला. त्यामुळे नाईलाज म्हणून प्रशासकाची नियुक्ती करावी लागली. आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत केली तरी कोणालाही हारतुरे घेऊन बोलावले नाही. तुम्हीच हा कारखाना बंद पाडला, असा टोला कर्डिले यांनी नामदार प्राजक्त तनपुरे यांना लगावला.

यावेळी सुरेश करपे, रावसाहेब चाचा तनपुरे, तानाजी धसाळ, विठ्ठल बिडगर, उत्तमराव म्हसे, किशोर वने, शिवाजी सयाजी गाडे, शामराव निमसे, दादा पाटील सोनवणे, मच्छिंद्र तांबे, महेश पाटील, केशवराव कोळसे, रवींद्र म्हसे, बाळकृष्ण कोळसे, विजय डौले, नंदकुमार डोळस, अर्जुन बाचकर, उत्तमराव आढाव, गोरक्षनाथ तारडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, संभाजी तनपुरे, साहेबराव म्हसे, बाळकृष्ण बानकर, अण्णासाहेब शेटे, विजय बानकर, मार्केट कमिटीचे संचालक सुरेश बानकर, प्रफुल्ल शेळके, रोहिदास आढाव, सीताराम गोसावी, सुदाम शेळके, गोविंद म्हसे, बापूसाहेब धसाळ, वसंत आढाव, आदींसह सभासद उपस्थित होते. भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com