राहुरीचा एक प्रतिष्ठित व्यापारी शहरातून पसार

दातीर हत्या प्रकरणात हात असल्याचा संशय
राहुरीचा एक प्रतिष्ठित व्यापारी शहरातून पसार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणी एकूण चारजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले. तर आणखी दोन आरोपी अद्याप पसार आहेत. मात्र, या घटनेत शहरातील आणखी एका मोठ्या व्यापार्‍याचा हात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घटनेनंतर तो व्यापारी राहुरी शहरातून गायब झाला असून त्याचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ आहे. या व्यापार्‍याने त्यात दोन आरोपींना पसार होण्यास मदत केली असल्याची चर्चा होत असून पोलीस त्या व्यापार्‍याचा शोध घेत आहेत.

दातीर यांच्या हत्येमुळे राहुरी तालुक्यासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. घटने नंतर लाल्या ऊर्फ अर्जून विक्रम माळी याला शेरी चिखलठाण येथून ताब्यात घेतले तर तौफिक शेख याला नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून ताब्यात घेतले. या दोन आरोपींच्या जबाबावरून या घटनेत मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे हा असून अक्षय कुलथे हा आरोपी गुन्ह्यात सामिल असल्याचे समोर आले.

मोरेसह अक्षय कुलथे हे दोन आरोपी अद्याप पसार असून पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत. घटनेनंतर तालुक्यातील विविध संघटनांकडून दातीर यांच्या कुटूंबीयांना पोलीस संरक्षण मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदने देण्यात आली होती. त्यानुसार काल दि. 12 एप्रिल रोजी दातीर यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. तसेच या घटनेत अपहरणासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी तसेच दातीर यांना मारहाण करताना वापरण्यात आलेले दगड पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

मात्र, या घटनेत शहरातील आणखी एक मोठा व्यापारी सामील असल्याची माहिती मिळत आहे. या व्यापार्‍यानेच दोन आरोपींना पळवून लावण्यास मदत केल्याची चर्चा सुरू आहे. सध्या तो व्यापारी पसार असून त्याचा मोबाईल देखील स्वीचऑफ लागत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या व्यापार्‍याची दातीर हत्या प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे? तो व्यापारी कोण? याचा कसून शोध सुरू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com