
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही राहुरी शहर व तालुक्यात गुटख्याची माव्याची दणक्यात विक्री सुरू आहे. राहुरी पोलीस खात्याकडूनच या व्यवसायाला अर्थपुर्ण अभय दिले जात असल्याने गुटखा व मावा विक्री जोमात आणि पोलीस प्रशासन कोमात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यात व शहरात राजरोसपणे गुटखा व मावा विक्री सुरू आहे. गावोगावच्या किराणा दुकानात व लहान- मोठ्या व्यावसायिकांकडे गुटखा व मावा सहज मिळत असल्याने राहुरीत पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. सध्या तरी या विक्रीला राहुरीत ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात तर चक्क किराणा दुकानांमध्ये देखील गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे. बंदी असलेला गुटखा खाणारेही बिनधास्त असून, सहजपणे ते कुठेही पिचकार्या मारताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा गुटखा बंदी कायदा राहुरीत मात्र, निव्वळ फार्स ठरला आहे.
राहुरी शहरात व तालुक्यात गुटखा व मावा खुलेआम विक्री होत असताना राहुरी पोलिसांनी कुठल्याही विक्रेत्यांवर गेल्या महिन्यांमध्ये कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. तसेच पोलिसांकडूनही गुटखा व मावा विक्रेत्यांवर कारवाई केल्याचे दिसून आले नाही. बेकायदा गुटख्याची विक्री सुरू असताना पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतंय? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. जागोजागीच्या काही टपर्या आणि दुकानांमध्ये मिळणार्या गुटखा व मावामुळे गुटख्याला नक्की बंदी आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. बंदी असलेली वस्तू सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.
परंतु राहुरी तालुक्यात मावा व गुटखा मुबलक प्रमाणात मिळत असल्याने बंदीबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. राहुरी शहरात व तालुक्यात हजारपेक्षा जास्त पानटपर्या आहेत. अनेक विक्रेते गुटख्याची व मावा लपवून ठेवून विक्री करतात, तर काही उघडपणे गुटख्याची विक्री करताना दिसतात. अनेकांचे टपरीचालकांचे पोलिसांशी साटेलोटे असल्याने बिनदिक्कतपणे गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. गेल्या काही वर्षांत मावा व गुटख्याच्या व्यसनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढल्याचे वैद्यकिय तज्ञ सांगत आहे.
त्यामुळे तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सरकारचे राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, राहुरी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरात व तालुक्यात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होत आहे. शाळेच्या परिसरात गुटखा विक्रीस बंदी असूनही अनेक टपर्या, दुकानांत गुटख्याची पाकिटे व मावाच्या पुड्यावक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुटख्याचे व्यसन वाढल्याने नव्यानेच रूजू झालेले पोलीस निरीक्षक याबाबत अनभिज्ञ कसे? असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होत असून त्यांच्या बदलीची मागणी होत आहे.