
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
जुन्या पेन्शन मागणीबाबतच्या संपाला विरोध म्हणून राज्यातील सर्वसामान्य शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, कष्टकरी आदींचा मोर्चा राहुरीत आज 21 मार्च रोजी दुपारी 12 वाजता संत गाडगे महाराज आश्रम शाळा नगर मनमाड रोड राहुरी येथून निघणार असल्याची माहिती समन्वय समितीकडून देण्यात आली आहे.
याबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, पेन्शन योजनेसाठी शासकीय कामगारांनी संप केला. परंतु, अतिवृष्टी व इतर नैसर्गिक संकटे तसेच शेतीमालाचे उत्पादन खर्चाचे वाढलेले भाव व शेतीमालाला मिळणारा अत्यल्प भाव यातून शेती व शेतकरी भरडला जात असताना गडगंज पगार घेणारे पगारदार शासकीय कर्मचारी करुन अन्यायकारक मागण्या करतात.
सेवानिवृत्तीचे वय 50 वर्षे किंवा जास्तीत जास्त वीस वर्षे सेवा याप्रमाणे करून वाढत चाललेली सुशिक्षित बेरोजगारी थांबवावी. करोना काळात जवळपास दोन वर्षे शाळेतच न गेलेल्या शिक्षक-प्राध्यापकांचे पगार दहा टक्के देऊन उर्वरित रक्कम वसूल करावी. वेळोवेळी शासनाकडून देण्यात येणार्या पगारवाढी देताना हे सर्वसामान्य नागरिकांच्या कर रूपी पैशातूनच देत असल्याने सामान्य नागरिकांना विचारणा केल्याशिवाय याबाबत निर्णय होऊ नये अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर अॅड. रावसाहेब करपे, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, राहुरीचे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे, कारखान्याचे संचालक विजयराव डौले, पत्रकार सुनील भुजाडी, अनिल डावखर, दीपक तनपुरे, राऊकाका तनपुरे, मधुकर भुजाडी, नागेश पानसरे, चिमणभाई पटेल, दिनकर पवार, अब्दुल शेख, माजी नगराध्यक्ष अरुण ठोकळे, तनपुरे, मधुकर तारडे, बाळासाहेब केळकर, सुनील रासने, संजय कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष आर. आर. तनपुरे, प्रवीण शिरसाट, वंचितचे पिंटूनाना साळवे आदींसह मान्यवरांच्या स्वाक्षर्या आहेत नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र लोखंडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती आ. प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आदींना पाठविण्यात आल्या आहेत.
मोर्चेकर्यांच्या मागण्या
जुनी पेन्शन बंद करा अन्यथा जुना पगार व जुनी पेन्शन लागू करा, कमाल वेतन कायदा आणा, पती व पत्नीने घेतलेले वेगवेगळे घरभाडे भत्ते वसूल करा, वेतन आयोग बंद करा, पगारवाढीसाठी केलेल्या कॉपीराईट पीएचडींची तपासणी करा, सेवानिवृत्ती वय 50 अथवा जास्तीत जास्त 20 वर्षे सेवेचा नियम करा; दोन वर्षे करोनाकाळात शाळेत न गेलेल्या शिक्षक-प्राध्यापकांकडून पगााची 90 टक्के रक्कम वसूल करा; सामान्य नागरिकांना विचारल्याशिवाय पगारवाढ करु नका.