एक-एक इंचासाठी लढू
सार्वमत

एक-एक इंचासाठी लढू

के.के.रेंज विस्तारीकरण : ग्रामस्थांच्या बैठकीत संतप्त सूर, जनआंदोलन उभारण्याचा ठराव

Arvind Arkhade

बारागाव नांदूर |वार्ताहर| Baragav Nandur

राहुरीकरांनी मुळा धरण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ व के.के.रेंज क्षेत्रासाठी यापूर्वीच आपल्या सोन्यासारख्या जमिनी मातीमोल भावाने देऊन या प्रकल्पांसाठी त्याग केला आहे. पुनर्वसित झाल्यानंतर कसेबसे जीवन जगणे सुरू आहे.

आता पुन्हा के.के.रेंज-2 अंतर्गत जमीन देण्याची वेळ आल्यास एक इंचही जमीन देणार नाही, असा संतप्त सूर राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील 12 गावांमध्ये उमटला आहे. त्यासाठी आता जनआंदोलन करण्याचा ठराव संमत करण्यात आला. या जनआंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारण्याचा निर्णय के.के. रेंज समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

दोन दिवसांपूर्वी लष्कराच्या ताफ्यातील जवानांनी या 12 गावांमध्ये नकाशासाठी मोजमाप सुरू केले आहे. त्यामुळे या भागातील नागरिक धास्तावले आहेत.

राहुरी तालुक्यातील चिंचाळे येथे के.के. रेंज अधिग्रहण संदर्भात समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. शेकडो ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून के.के.रेंज अधिग्रहणाबाबत संताप व्यक्त केला. गाडे म्हणाले, बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटातील गावांवर के.के.रेंजचे संकट निर्माण झाले आहे. स्व. शिवाजीराजे गाडे यांनी कुटुंबाप्रमाणे हा गट सांभाळला आहे.

के.के. रेंजचे अधिग्रहण होऊ देणार नाही. त्यासाठी सर्व राजकीय ताकद पणाला लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, वावरथ, जांभळी, कुरणवाडी, चिंचाळे, घोरपडवाडी, बाभूळगाव, ताहाराबाद, गाडकवाडी, गडधे आखाडा, वरवंडी, दरडगाव थडी आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी शरद थोरात, अण्णासाहेब सोडनर, रामदास बाचकर, बापू तमनर, नारायण तमनर, अण्णासाहेब खिलारी, नवनाथ कोळसे, डॉ. ज्ञानेश्वर आघाव, बाबा वडीतके, घमाजी जाधव, गुलाबभाई शेख, सर्जेदाव केदारी यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

शेतकरी बांधवांवर अत्यंत भयानक संकट आले आहे. या अगोदर मुळा धरणासाठी, मुळा नदीकाठची सुपीक जमीन महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी अधिग्रहित करण्यात आली. आता के. के. रेंजने संपूर्ण जमिनीचे अधिग्रहण केल्याने 12 गावातील शेतकरी वर्गाचे धाबे दणाणले आहेत.कष्टाने हे क्षेत्र सुजलाम सुफलाम करण्यात आले आहे.

- शिवाजीराव पवार

जमीन अधिग्रहणाने वावरथ, जांभळी, जांभुळबन, परिसरातील तरूण पिढीचे भविष्य संपुष्टात आले आहे. यापूर्वीही जांभुळबन येथे के. के. रेंजने जमीन अधिग्रहण केले होते. त्यांना अद्यापपर्यंत मोबदला मिळाला नाही. त्या धक्क्यातून स्थिर होत असतानाच दुसर्‍या टप्प्यात के. के. रेंजने पुन्हा डोके वर काढून संपुष्टात आणले ही दुदैवी बाब आहे.

- ज्ञानेश्वर बाचकर

वाडवडिलांनी कष्टाने भावी पिढीसाठी जमीन सपाटीकरण केले. त्यासाठी कर्ज घेतले. पुढे भविष्याचा वेध घेत असताना पुन्हा के. के. रेंजच्या रूपाने कुर्‍हाड आली आहे. यातून सावरणे अवघड झाले आहे.

-फैजुद्दीन पटेल

राहुरी तालुक्यातील के.के. रेंज अधिग्रहीत क्षेत्राचे मूल्यमापन जवानांकडून सुरू आहे. त्यामुळे धास्तावलेल्या शेतकर्‍यांनी जवानांची भेट घेतली. ‘हमारी हरीभरी जमीन लेकर आपको क्या मिलेगा?’ असा प्रश्न विचारला. यावेळी सैन्यदलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, हमे तो साहब ने बताया है, हमे जो बताया गया वो हम कर रहे है, असे उत्तर मिळाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com