राहुरीच्या जेलमधून पळालेला आरोपी उक्कलगावहून पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार

राहुरीच्या जेलमधून पळालेला आरोपी 
उक्कलगावहून पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार

बेलापूर |वार्ताहर| Belapur

राहुरी येथील जेलचे गज कापून पसार झालेल्या दोन आरोपींपैकी एक जण श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे नातेवाईकाकडे आला असता श्रीरामपूर पोलिसांनी त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला.

राहुरी कारागृहाचे गज कापून पाच आरोपी पसार झाले होते. पैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी व रवी पोपट लोंढे हे दोघे आरोपी अजूनही पसार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. यातील एक आरोपी नितीन उर्फ सोन्या माळी हा उक्कलगाव (ता. श्रीरामपूर) येथील त्याच्या नातेवाईकांकडे आला असल्याची खबर बेलापूर पोलिसांना मिळाली.

बेलापूरच्या बाजारात मोटारसायकली चोरीस गेल्या होत्या. त्याचा शोध घेत असतानाच पोलिसांना गुप्त बातमीदाराने खबर दिली की, राहुरीच्या कारागृहातून गज तोडून पळालेला आरोपी उक्कलगाव शिवारात नातेवाईकांकडे आला आहे. बातमी समजताच पोलीस तातडीने मिळालेल्या ठिकाणी मोटारसायकलवर पोहोचले. मोटारसायकलचा आवाज येताच आरोपी पोलिसांसमोर जवळच असलेल्या उसाच्या शेतात पळाला. जादा पोलीस कुमक मागवून उसाच्या शेतात शोध घेतला परंतु आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांच्या अनेक गाड्या उक्कलगावाच्या दिशेने धावू लागल्यामुळे गावकर्‍यांनाही नेमके काय झाले हे समजण्यास बराच उशिर झाला.

आरोपी असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस होता तसेच रात्रीची वेळ असल्यामुळे शोध कार्यात अडचणी आल्या. त्यातच या परिसरात कायमच बिबट्याचा वावर असल्यामुळे पोलिसांना उसात आरोपीचा शोध घेणे अवघड झाले. तरीही पोलिसांनी जीव धोक्यात घालून उसात आरोपीचा शोध घेण्याचा रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात फौजफाटा असतानाही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आणि पोलिसांना रिकाम्या हाती परत फिरावे लागले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com