राहुरीत पोलीस अधिकार्‍याच्या आशीर्वादाने अवैध धंदे बोकाळले

राहुरीत पोलीस अधिकार्‍याच्या आशीर्वादाने अवैध धंदे बोकाळले

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला आहे. पोलीस निरीक्षकपदी राजेंद्र इंगळे हे विराजमान झाल्यापासून गुन्हेगारीसह अवैध धंदे वाढले आहेत. तर फिर्याद घेऊन येणार्‍या नागरिकांसह महिलांना उर्मटपणे बोलून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची तक्रारी होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून या अकार्यक्षम अधिकार्‍याची बदली करण्याची मागणी नागरिकांनी वरिष्ठांकडे केली आहे.

पोलीस निरीक्षक इंगळे हे राहुरी तालुक्यात पदभार स्वीकारल्यापासून अल्पावधीतच वादग्रस्त अधिकारी ठरले आहेत. तालुक्यातील अवैध धंदे रोखण्यास ते कुचकामी ठरले असून घरफोडी, दुकानफोड्यासारख्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, राहुरी पोलीस ठाण्यात इंगळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात वाद मिटवून देतो, असे म्हणून गोरखधंदा करणार्‍या दलालांची संख्या वाढली आहे. त्यांना पोलीस निरीक्षक इंगळे हे खतपाणी घालत असल्याची चर्चा होत आहे.

तर तालुक्यात अवैध व्यवसाय करणार्‍या, मटका, जुगार अड्डे चालक, हातभट्टीची गावठी दारूअड्डे चालक, बिंगो जुगारचालक, यांच्याबरोबर अर्थपूर्ण संबधामुळे अवैध धंदे वाढले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

राज्यात गुटखाबंदी व मटकाबंदी असताना राहुरी तालुक्यात मात्र, इंगळे यांच्या मेहेरबानीमुळे खुलेआम गुटखा विक्री सुरू असून मटकाही जोरात सुरू आहे. अनेक गावात मटक्याच्या पेढ्या उघडण्यात आल्या असून करोना काळातही मटका अड्ड्यांवर मटकेबहाद्दरांची गर्दी वाढत आहे. बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्‍या चालकांकडूनही आर्थिक मागणी केली जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. राहुरी फॅक्टरी येथे सायकल दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. तर तालुक्यात अनेक चोर्‍यांच्या घटना वाढल्या असल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून इंगळे यांची अन्यत्र बदली करण्याची मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com