मुसळधार पावसाने देवळाली प्रवरासह परिसरातील शेतकरी सुखावला

पाऊस
पाऊस

देवळाली प्रवरा | वार्ताहार | Deolali Pravara

काल रविवारी (दि.११ जुलै) रोजी सायंकाळी सात वाजणेच्या सुमारास देवळाली प्रवरासह (Deolali Pravara) परिसरात एकतास भर मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विजाचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही वेळाने वारा बंद झाला आणि पावसाचा जोर वाढला. बघता बघता काहीक्षणातच चोहीकडे पाणीच पाणी झाले. सुमारे तासभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शेतात उभ्या पिकात पाणीचपाणी झाल्यामुळे शेताला तळ्याचे स्वरुप आले होते. परिसरात अशा प्रकारचा पाऊस यंदा पहिल्यांदाच झाला आहे.

या पावसाने कपाशी,मका, सोयाबीन, मूग, बाजरी आदी पिकांना जलसंजिवणी मिळाली आहे. पावसाचा जोर इतका होता कि, पावसामुळे ओढेनाले व चाऱ्या पाण्याने भरुन वाहत होते तर अनेकांच्या जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने दुध उत्पादकांची तारांबळ उडाली. रस्ते, गटारी पाण्याने तुडुंब भरुन वाहत असल्याचे यंदा पहिल्यादाच बघायला मिळाले. तासभरानंतर पावसाचा जोर कमी झाला. मात्र रात्री उशीरापर्यंत कमीजास्त प्रमाणात पाऊस सुरुच होता.

सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना शेतात पाणीचपाणी साचलेले पाहून आनंद झाला. सोमवारी सकाळीही पावसाचा एक चांगला झटका झाला. अशा प्रकारे आणखी चार, पाच पाऊस झाले तर खरीपाची चिंता मिटणार आहे व उन्हाळ्यात देखिल पाणी टंचाई जाणवणार नाही असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com