आंबी |वार्ताहर| Ambi

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने 15 मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन दिले होते.

मात्र ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या मागण्या अद्यापही मंजूर न झाल्याने राज्यातील 27 हजार 920 ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेले 60 हजार कर्मचारी येत्या 19 एप्रिलपासून संपावर जाणार आहेत. या संपात राहुरी तालुक्यातील कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ढोकणे, उपाध्यक्ष आत्माराम घुणे, जिल्हा सचिव दिलीप डिके, राहुरी तालुका अध्यक्ष रामदास ससाणे, उपाध्यक्ष ज्ञानदेव डुकरे, कार्याध्यक्ष संदिप जेऊघाले, सचिव अमर नेहे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

साठ हजार कर्मचार्यांच्या वेतनाचा प्रश्न 20 वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत कर्मचार्यांनी 10 जुलै 2018 रोजी नागपूर येथे भव्य लाँगमार्च, 07 जानेवारी 2019 ला भव्य अधिवेशन घेतले होते. तत्कालीन राज्यमंत्री दादा भुसे यांनी अधिवेशनात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच लातूर अधिवेशनात ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते.

मात्र अद्यापपावेतो ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या मागण्या संदर्भात शासनस्तरावर ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील 60 हजार कर्मचारी 19 एप्रिलपासून मुबंई येथील मैदानात बेमुदत संपावर जाणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.