राहुरीतील 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू

कोंढवडचे सरपंचपद सर्वसाधारणसाठी || तीन ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी
राहुरीतील 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील स्वतंत्र महसुली गावांच्या 11 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगूल वाजले असून पुढील आठवड्यात या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी तसेच गावपुढार्‍यांनी पॅनल बनवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

दरम्यान तालुक्यातील अनेक ठिकाणी इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने निवडणुका चुरशीच्या होणार असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील या 11 गावांच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी रात्रीच्यावेळी ठिकठिकाणी बैठका सुरू झाल्या आहेत. सरपंचपद हे जनतेतून असल्याने अनेकांना सरपंचपद व सदस्याची खुर्ची खुणावत असल्याने मतदारयादी चाळत आकड्यांची गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे.

सरपंच होण्यासाठी गावपुढार्‍यांनी प्रत्येक वॉर्डातील प्रबळ उमेदवारांची शोध मोहीम हाती घेतली आहे. सरपंचपद आरक्षीत असलेल्या प्रवर्गाचा व जो आपल्याला भविष्यात वरचढ ठरणार नाही असा सक्षम उमेदवार शोधला जात आहे. आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. अधिक इच्छुक असलेल्या ठिकाणी उपसरपंचपदाचे गाजर दाखविण्यात येत आहे.

काही अतिउत्साही इच्छुकांनी मला सरपंचपदाची उमेदवारी दिल्यास पार्टीचा सर्व खर्च, उमेदवारांची घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याची तयारी दर्शविली आहे. तर काहींनी निवडणूक बिनविरोध कशी होईल व आपला कसा नंबर लागेल यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे समजते. या 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 6 गावांचे सरपंचपद स्त्रियांसाठी राखिव असल्याने आपल्याच कारभारणीला सरपंचपदी विराजमान करण्यासाठी ‘आटापिटा’ अनेकांनी चालवला आहे. तसेच आपला कोणत्याच पार्टीकडून विचार होणार नसल्याने अपक्ष किंवा आपणच पॅनल तयार करून ‘सवतासुभा’ करण्यासाठी गाव पिंजून धडपड सुरू केली आहे. तर अनेकांची या निवडणुकीपासून तटस्थ भूमिका पाहावयास मिळत आहे.

सरपंचपदांचे आरक्षण

आरडगाव (सर्वसाधारण स्त्री), केंदळ खुर्द (अनुसूचित जाती), सोनगाव (ना.मा.प्र.स्त्री), ताहाराबाद (अनुसूचित जाती), तुळापूर (ना.मा.प्र), कोल्हार खुर्द (सर्वसाधारण स्त्री), खडांबे खुर्द (अनुसूचित जमाती), कोंढवड (सर्वसाधारण), मांजरी (अनुसूचित जाती स्त्री), ब्राम्हणगाव भांड (अनुसूचित जमाती स्त्री), मानोरी (सर्वसाधारण स्त्री)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com