राहुरीच्या पूर्व भागात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू

राहुरीच्या पूर्व भागात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील पूर्व भागात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहु लागल्याने निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून असल्याने तसेच सरपंचपदाचे आरक्षण अद्याप जाहीर नसतानाही सरपंचपदाच्या खुर्चीसाठी इच्छुंकानी निवडणुकांची जय्यत तयारी सुरू केली आहे.

दरम्यान राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील आरडगाव, मांजरी, मानोरी, केंदळ खुर्द सह अन्य गावांच्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले नाही. काही इच्छुक बहाद्दरांनी जर सरपंचपद खुले निघाले तर स्वत: आणि सरपंचपद स्त्री राखीव निघाले तर आपल्या कारभारणीला सत्तेच्या खुर्चीवर बसविण्यासाठी आताच फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. तर मीच उमेदवार असा तोरा मिरवत गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे.

तसेच सदस्य पदासाठीही इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काहींनी वार्डात फेरी मारून मतांची गोळाबेरीज सुरू केल्याचे समजते. त्यामुळे ही निवडणूक चांगली गाजणार आसल्याचे चित्र दिसून येत आहे.महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तालुक्यात नुकत्याच विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायत सदस्य प्रभाग वार्डनिहाय राखीव आरक्षण प्रारूप रचना आराखडा तयार करुन सोडती जाहीर केल्या आहेत. शिंदे-फडवणीस सरकारच्या काळात सरपंचपदाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 2019 पर्यंत जिल्ह्यातील सरपंचपदाची निवड थेट जनतेतून झाली.

मध्यंतरी राज्यात महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आले. या सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द केला. भाजप-शिवसेना (शिंदे गट) सत्तेवर आले. त्यांनी पुन्हा सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला.ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर सन 2022 या कालावधीत होणार्‍याया निवडणुकीत या गावामध्ये तनपुरे, विखे, कर्डीले गटात ही निवडणूक रंगणार असल्याने हे सर्व गटाने संभाव्य उमेद्वाराची चाचपणी सुरू केली आहे.

सत्ताधारी सत्ता राखण्यात तर विरोधक सत्तेत येण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणार आहे. तर काही इच्छूक आपल्याला कोणत्यातरी गटाची उमेद्वारी मिळावी म्हणून गावातील पुढार्‍यांना गळ घालीत आहे. या निवडणुकीत सर्वच गटाच्या नेत्यांनी तरूणांना संधी देऊन नवा चेहरा देण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com