आरडगाव |वार्ताहर| Aradgav

हरभरा पिकावरील मर रोग व घाटे अळी नियंत्रण ठेवण्यासाठी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन करणे गरजेचे असते असे मार्गदर्शन राहुरी कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर यांनी केले.

राहुरी तालुक्यातील आरडगाव, तांदुळवाडी, मानोरी येथील हरभरा पीक प्रात्यक्षिक प्लॉट क्रॉपसॅप पाहणी करत राहुरी कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर, कृषी अधिकारी बाळासाहेब सूळ, मानोरी कृषी अधिकारी दुर्गा सहाणे यांनी हरभरा पीक एक महिन्याचे होईपर्यंत निंदणी आणि कोळपणी करून तण विरहीत ठेवावे.

कीड नियंत्रणाची वेळ निश्चित करण्यासाठी आठवड्यातून एक दोन वेळेस पिकाची बारकाईने पाहणी करून पानांवर बारीक बारीक पांढरे डाग दिसून येताच अथवा पिकाच्या एक मीटर लांब ओळीत 1-2 अळ्या आढळून आल्यास अथवा 5 टक्के घाट्यावर अळीचा उपद्रव दिसून येताच एक हेक्टर क्षेत्रात 8-10 फेरोमोन (कामगंध) सापळे बांबूच्या सहाय्याने पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंचीवर अडकवून सलग 2 ते 3 दिवस प्रत्येक सापळ्यात 8-10 पतंग येत असल्यास कीटकनाशकाची फवारणी/धुरळणी करावी.

पीक फुलोर्यात आणि घाटे भरताना अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास शक्य झाल्यास अळ्या वेचून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.त्यामुळे घाटे अळी नियंत्रणात येते.

याप्रसंगी गणेश झुगे, बाळासाहेब आटोळे, श्रीकांत वने, आनंद वने, संतोष म्हसे, अर्जुन वने, गवजी आढाव, भाऊसाहेब आढाव, मधुकर धसाळ, कुशाबाप्पू ढेरे, शोभा वने, गोरक्षनाथ थोरात, आकाश आढाव आदींसह शेतकर्यांना मार्गदर्शन केले.