राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांना लागले कपाशी लागवडीचे वेध

राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांना लागले कपाशी लागवडीचे वेध

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

चक्रीवादळही संपले आणि शेतकर्‍यांना आता आगस कपाशीचे लागवडीचे वेध लागले आहेत. पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या या नगदी पिकाची साधारणपणे 25 मेपासून बागायत भागात कपाशीची लागवड दरवर्षी होत असल्याने यंदाही त्याप्रमाणे लगबग सुरु झाली आहे.

गहू आणि कांद्याचे पीक मार्च, एप्रिलमध्ये निघाल्यानंतर शेतकरी खरिपाच्या तयारीला लागले होते. त्याप्रमाणे जमिनीची मशागत करुन लागवडीची वाट पाहत होते. येत्या एक-दोन दिवसात लागवडीला सुरुवात होणार आहे. तर काही ठिकाणी विहीर पाण्याची सोय असल्याने शेतकर्‍यांनी कपाशी लागवडी सुरु केल्या आहेत. कपाशी पिकासाठी शेतकर्‍यांनी चार फुटी सरी पाडली आहे. यामध्ये एक ते दोन फुट अंतरावर कपाशीचे बी टोकण पध्दतीने लावण्यात येते.

यामुळे रोपातील अंतर चार बाय एक किंवा चार बाय दोन असे राहते. हे अंतर वेगवेगळ्या वाणा नुसार बदलले जाते. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा विहीर व कुपनलिकांची पाणी पातळी चांगली असल्याने काही शेतकर्‍यांनी ठिबकद्वारे कपाशीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे शेतात ठिबकच्या नळ्या पसरुन पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कपाशी हे कमी पाण्याचे पीक असल्याने ठिबकद्वारे त्याला मोजकेच पाणी देता येते. यामुळे शेतकर्‍यांना पाहिजे तसे उत्पन्न घेता येते. या पध्दतीनुसार साधारणपणे एकरी पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत कापूस काढता येतो. असे प्रगतीशील शेतकरी अनिल मोढे यांनी सांगितले. त्यामुळे पारंपरिक शेतीला आता आधुनिक शेतीची जोड लागली आहे.

बदलत्या काळानुसार आता शेतकरी देखील बदलत असून त्याचे शेतीवर वेगवेगळे प्रयोग सुरु असतात. त्यातूनच आता ठिबकद्वारे कपाशी लागवडीची पध्दत समोर आली आहे.

मध्यतंरी आलेल्या चक्रीवादळानंतर दोन दिवस हवेत गारवा निर्माण झाला होता. परंतु त्यानंतर मात्र, कमालीचे तपमान वाढले असून 37 अंशाच्या पुढे तपमान गेले आहे. सूर्य आग ओकू लागल्याने जिवाची लाहीलाही होत आहे. प्रचंड तपमानाचा परिणाम म्हणा किंवा पुन्हा समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा म्हणा आभाळ पुन्हा फिरायला लागले आहे. ढगही निघत आहेत. म्हणूनच आपली लागवड उशीरा होऊ नये, यासाठी 25 मे पासून लागवड करण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे. सध्या बाजारात कपाशीचे भरपूर वाण दाखल झाले आहेत. मात्र, ठराविक वाणालाच शेतकर्‍यांची पसंती आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com