राहुरी फॅक्टरी |वार्ताहर| Rahuri Factory

आगामी काळात देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवडणूक होत असून त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे प्रभागनिहाय बैठक घेऊन

नागरिकांशी संवाद साधण्याच्या पहिल्याच बैठकीत राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर येथील नागरिकांनी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर नागरी समस्यांवरून भडीमार केला. जनतेशी संवाद साधण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून आयोजित केलेली ही बैठक नगराध्यक्ष कदम यांच्या अंगलट आल्याची चर्चा राहुरी फॅक्टरी परिसरात सुरू आहे.

राहुरी फॅक्टरी भागातील अंबिकानगर भागात दि. 7 फेब्रुवारी रोजी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आली. परंतु या बैठकीत येथील महिला रहिवाशी तसेच तरुणांनी नागरी समस्या मांडायला सुरुवात केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेली बैठक नगराध्यक्षांसह कार्यकर्त्यांच्या अंगलट आली. या बैठकीत नाईलाजाने नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता-देता त्यांच्या नाकीनऊ आले.

विशेषतः महिला व काही तरुणांनी संधीचे सोने करत विविध समस्यांवरून प्रश्नांची सरबत्ती करत नगराध्यक्षांना जाब विचारला. साडेचार वर्षांत पहिल्यांदा विचारायला आल्याचे अनेकांनी बोलून दाखविले. रस्ते, नाली दुरुस्ती व स्वच्छता आदींबाबत नगरपालिका सुविधा पुरवीत नसल्याने नगराध्यक्ष कदम यांना येथील नागरिकांनी धारेवर धरले. यावेळी नगराध्यक्ष कदम यांच्यासमवेत नगरसेवक अण्णासाहेब चोथे, एकनाथ बनकर व काही प्रमुख कार्यकर्ते आदी उपस्थित होते.