राहुरी फॅक्टरीवर ढाबा चालकांकडून नियम धाब्यावर

राजकीय कार्यकर्त्यांचा व कर्मचार्‍यांचा बनला अड्डा
राहुरी फॅक्टरीवर ढाबा चालकांकडून नियम धाब्यावर

राहुरी फॅक्टरी |वार्ताहर| Rahuri Factory

नगर-मनमाड महामार्गालगत देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या परराज्यातील एका ढाबा चालकाकडून प्रशासनाचे नियम धाब्यावर बसविले जात असून या ढाब्यावर परराज्यातील गिर्‍हाईकांसह स्थानिक नागरिकांच्या पंगती बसत असल्याने करोनाला एक प्रकारे निमंत्रण देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. नगरपालिका प्रशासन अथवा तालुका स्तरावरील पथक कारवाई का करत नाही? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सुविधा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाच्या पूर्णपणे विरोधात जाऊन नगर-मनमाड मार्गावरील एक ढाबाचालक मनमानी करीत आहे. या ढाब्यावर 24 तास नगर-मनमाड मार्गावरून जाणार्‍या नागरिकांना तसेच दारूच्या नशेत तर्र झालेल्या स्थानिक तरुणांना खुलेआम जेवणाची व्यवस्था केली जाते. कुठलाही सोशल डिस्टन्सिंग न पाळता पंगती उठविल्या जातात.

देवळाली नगरपालिका हद्दीतील या ढाब्याबाबत अनेकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. परंतु पालिका कर्मचार्‍यांचेच हे बसण्या उठण्याचे हे ठिकाण बनल्याने नगरपालिकेकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे समोर आले आहे. एक प्रकारे देवळाली नागरपालिकेचे व पोलीस प्रशासनाचे या ढाबाचालकास पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. येत्या काळात तोबा गर्दी करणार्‍या या ढाबा चालकावर तहसीलदार शेख काय कारवाई करणार? याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

नगर-मनमाड रस्त्यावरील या ढाब्यावर अनेकजण मद्य पार्सल आणून त्याचा आस्वाद घेतात. अनेकवेळा रात्री-अपरात्री वाद विवादाचे प्रसंगही या ढाब्यावर घडले असतानाही पेट्रोलिंग करत असलेले पोलीस कर्मचारी याकडे कानाडोळा करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नगरपालिका प्रशासनातील कर्मचार्‍यांचा तसेच काही राजकीय मंडळींच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा हा मद्यपान करण्याचा अड्डा असून तुझ्यावर आमच्याशिवाय कोणीही कारवाई करु शकत नाही. तू आमची सोय करीत जा, आम्ही तुझ्या हॉटेलवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले जाते. त्यामुळे काहीही कारवाई होत नसल्याची चर्चा होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com