राहुरी फॅक्टरीला अंत्यविधी मार्गावर कचरा टाकून रस्ता बंद

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या ठेकेदाराचा प्रताप; नागरिकांचा ठिय्या
कचरा file photo
कचरा file photo

राहुरी फॅक्टरी |वार्ताहर| Rahuri factory

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या ठेकेदाराने मृतात्म्याच्या शेवटच्या प्रवासाच्या रस्त्यावर कचर्‍याचे ढीग व मृत जनावरे टाकून रस्ता बंद करून मृतदेहाची अहवेलना केली आहे. विविध सामाजिक संघटनानी अमरधाम येथील घाणीच्या विळख्यात ठिय्या आंदोलन करून आरोग्य विभागाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

राहुरी कारखाना येथे डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या जागेत असलेल्या अमरधामच्या रस्त्यावर नगरपालिकेच्या आरोग्य ठेकेदाराने राहुरी कारखाना परिसरातील गोळा केलेला कचरा, मृत जनावरे व नगरपालिकेमार्फत ठराविक फी घेऊन उपसण्यात आलेला मैला अमरधाम रस्त्यावरील विसाव्याच्या ठिकाणी टाकून अमरधामकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करून मृत आत्म्याच्या शेवटच्या प्रवासालाही आरोग्य ठेकेदाराने आडकाठी निर्माण केली आहे.

त्यामुळे शेजारील अंबिकानगर रस्त्यावरून जाणार्‍या येणार्‍यांना दुर्गंधीचा वास येत असल्याने सत्ताधारी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी समक्ष पाहणी करून सामाजिक संघटना व अंबिकानगर, कामगार वसाहत या भागातील दत्तात्रय साळुंके, प्रशांत काळे आदी कार्यकर्त्यांना एकत्र जमवून घटनेची माहिती दिली. त्याचवेळी सर्वांनी एकमुखी निर्णय घेऊन अमरधाम रस्त्यावरील घाणीच्या साम्राज्यात ठिय्या आंदोलन सुरू केले.

दरम्यान या आंदोलनाची माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम व मुख्याधिकारी अजित निकत यांना आंदोलनकर्त्यांनी दिली. काही वेळातच मुख्याधिकारी अजित निकत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या ठिकाणावरील घाणीच्या साम्राज्याची पाहणी करून आंदोलकांसमोर निःशब्द उभे राहिले. त्यांनी तातडीने आरोग्य विभागाला जेसीबी, टेम्पो आदी साधन सामुग्री उपस्थित करून कचर्‍याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन याठिकाणी लावण्याचे आदेश दिले.

यावेळी उपस्थित आंदोलन कर्त्यांनी, देवळाली प्रवरा नगरपालिकेने डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीतील अमरधामचा विकास करण्यासाठी कारखाना ना हरकत प्रमाणपत्र देत असल्याचे सांगते. तर कारखान्याच्या मालकीच्या जागेत आरोग्य ठेकेदाराला कचरा, मृत जनावरे, कचरा टाकण्याचा अधिकार कुणी दिला? आदी प्रश्ननांचा भडीमार मुख्याधिकारी यांच्यावर केला. यावेळी मुख्याधिकारी अजित निकत यांनी अमरधामचा सर्व परिसर व रस्ता दिवसभरात कचरा व मृत जनावरे उचलून साफ करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात दत्तात्रय साळुंके, प्रशांत काळे, अतुल त्रिभुवन, मारुती मोरे, मनोज इनामदार, सतीश वाघ, किरण मोरे, प्रकाश मोरे, दीपक भंडारे, नितीन वाघ, बबलू गाढे, संदेश पाटोळे, दत्ता साळुंके, साई सातपुते, भरत गोंधळी, आदी सहभागी झाले होते. यावेळी नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक बन्सी वाळके, आरोग्य विभाग प्रमुख अमोल दातीर, कृष्णा महांकाळ, भारत शेटे, सचिन सरोदे उपस्थित होते.

राहुरी कारखाना ठिय्या आंदोलनाच्या घटनास्थळी मुख्याधिकारी अजित निकत यांनी आंदोलनकर्त्यांना येथील सर्व कचरा उचलण्याचे आश्वासन देत नगरपालिकेसह आरोग्य ठेकेदाराची चूक मान्य करीत आरोग्य विभाग प्रमुखास नोटीस काढून तसेच संबंधित आरोग्य ठेकेदाराविरुद्ध दंड आकारणीची कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

अमरधाम येथे ठिय्या आंदोलन चालू असताना नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना आंदोलकांनी आंदोलनस्थळी येण्याची विनंती केली असता कामात व्यस्त असल्याने मी येऊ शकत नाही. असे सांगून त्यांनी उपस्थित असलेल्या आरोग्य ठेकेदाराला भ्रमणभाषवर संपर्क साधून ठिय्या आंदोलनबाबत खडे बोल सुनावले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com