राहुरी फॅक्टरीवर घरफोडून 1 लाख 58 हजारांची रोकड लंपास

भरदिवसा घडली घटना ||तालुक्यात चोर्‍यांचे सत्र सुरूच || अधिकार्‍यांच्या बदलीची मागणी
राहुरी फॅक्टरीवर घरफोडून 1 लाख 58 हजारांची रोकड लंपास

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुुरी तालुक्यात चोरी आणि घरफोडीची मालिका सुरूच आहे. मागील अनेक घटनांचा तपास करण्यास राहुरी पोलिसांना अपयश आले असतानाच काल भरदिवसा दुपारी राहुरी फॅक्टरी येथील भरवस्तीतील बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 1 लाख 58 हजार रुपयांची रोकड अज्ञात दोन चोरट्यांनी लंपास केल्याने आता नागरिक आणि महिला, व्यापार्‍यांमध्ये मोठी दहशत वाढली आहे. चोर्‍या आणि घरफोड्यांचे सत्र थांबविण्यात अपयशी ठरलेल्या राहुरीच्या पोलीस निरीक्षकांची बदली करून राहुरीत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी नियुक्त करण्याची मागणी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करण्यात आली आहे. मंत्र्यांच्या तालुक्यात चोरटे दहशत पसरवित असून राहुरी पोलीस कुचकामी ठरल्याने नागरिकांसह व्यापार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सोमवारी राहुरी शहरात भरदिवसा महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र ओरबडण्याच्या घटनेला चोवीस तासही उलटून जात नाही तोच राहुरी तालुक्यातील देवळाली बंगला येथे काल मंगळवारी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून 1 लाख 58 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.

देवळाली बंगला येथील वरखडे-वाणी रस्त्यावर (इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोर) अशोक खराबे यांचे घर आहे. अशोक खराबे व त्यांचा मुलगा हर्षल हे ड्युटीवर गेले होते. तर अशोक खराबे यांच्या पत्नी व सूनबाई या आपल्या घराला कुलूप लावून देवळाली प्रवरा येथे नातेवाईकांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. याचवेळी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेले 1 लाख 58 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे.

याचवेळी खराबे यांच्या सूनबाई आपल्या नातेवाईकांसोबत घराजवळ आल्या असता ते अज्ञात चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी ही चोरी करून त्या ठिकाणाहून पळ काढल्याचे सौ. खराबे यांनी सांगितले. दरम्यान घटनास्थळी पोलीस हॅडकॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाठ दाखल झाले. चोरीचा पंचनामा करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेजही तपासले जात आहे.

भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड लंपास केल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. राहुरी तालुक्यात चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याने पोलीस प्रशासनाबद्दल सामान्य नागरिकांतून चीड व्यक्त होत आहे.

मागील आठवड्यात राहुरीच्या कारागृहातून पाचकैदी पसार झाले. त्यातील तिघेजण पकडले. मात्र, अद्यापही दोनजण पसार आहेत. त्यांचाही तपास गुलदस्त्यातच गेला आहे. तर राहुरी विद्यापीठातही ऊस चोरीला गेला. राहुरी शहरात भरदिवसा महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र ओरबडण्यात आले. नगर-मनमाड महामार्गावर वाहतुकीचा चक्काजाम होत असताना वाहतूक पोलीस मात्र, पाण्याच्या टाकीजवळ दुचाकीस्वारांना मास्क नसल्यास आर्थिकदृष्ट्या वेठीस धरीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यातूनच राहुरी पोलिसांची नाचक्की वाढू लागली आहे. गुन्हेगारीचा आलेख वेळीच रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांची बदली करून खमक्या अधिकार्‍यांच्या नियुक्तीची मागणी वाढू लागली आहे. अन्यथा आता व्यापारी, महिला आणि नागरिक राहुरी पोलिसांच्या अकार्यक्षमतेविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com