राहुरीत अतिक्रमणधारकांचा तहसीलवर विराट मोर्चा

अध्यादेश काढा, कायदे बदला पण गोरगरिबांना निर्वासित करू नका || राष्ट्रवादी हिवाळी अधिवेशनात बाजू मांडणार- आ. तनपुरे
राहुरीत अतिक्रमणधारकांचा तहसीलवर विराट मोर्चा

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

तुम्ही मला तुमचा माणूस म्हणून तुमच्या पाठीमागे उभा राहील, या अपेक्षेतून मला आमदार म्हणून निवडून दिले. त्या विश्वासाला तडा जाऊ न देता, मी आमदार असेपर्यंत गोरगरिबांच्या कोणत्याही घराला धक्का लागू देणार नाही. जर कोणतीही यंत्रणा अतिक्रमण काढण्यासाठी आली तर, सर्वांच्या पुढे मी उभा राहील. माय भगिनींनो कोणतेही दडपण घेऊ नका, तुमचा लहान-मोठा भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे आश्वासन राज्याचे माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिले.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासकीय व गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 2 लाख 22 हजार 253 छोटे-मोठे कुटुंब बेघर होऊन उघड्यावर येणार आहेत. शासनाने हा निर्णय रद्द करण्यासाठी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, तसेच गावाच्या लोकसंख्येप्रमाणे गावठाण मंजूर करून संबंधित जागा अतिक्रमण धारकांच्या नावावर करावी, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तहसील कार्यालयावर विराट जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी आ. तनपुरे मोर्चातील सहभागी झालेल्या जनतेला संबोधित करताना बोलत होते.

आ. तनपुरे म्हणाले, या सरकारचे उपमुख्यमंत्री कायदेपंडित आहेत. ते नेहमी विधानसभेत कोर्टाची भाषा बोलत असतात. मग न्यायालयाच्या या निर्णयामुळे गोरगरिब जनतेवर ही वेळ येत असताना राज्य सरकार झोपले होते का? यासाठी सरकारने ताबडतोब या निर्णयाच्या विरोधात स्थगिती आणणे गरजेचे होते. सरकारला जरी अधिवेशन चालू नव्हते तरी तात्काळ मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आध्यादेश काढून कायद्यात बदल करता आला असता. अशी भूमिका सरकारने घेणे आवश्यक होते. ग्रामविकास विभागाचे व महसूल विभागाचे काही कायदे असतील तर तात्काळ आध्यादेश काढून कायद्यामध्ये सरकारने सुधारणा करावी. त्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष एकमुखाने त्याला पाठिंबा देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

देशात पुर्वी काँग्रेच्या काळात इंदिरा आवास योजनेत गोरगरिबांना घरकूल देत असत. त्यावेळी फक्त त्या लाभार्थ्याला घराची गरज लक्षात घेतली जात होती. मात्र, आता घरकुलासाठी खुपच जाचक अटी घातल्या आहेत. फक्त अ, ब, क याद्यांचा घोळ घालून ठेवला आहे. यात गावागावांचे सरपंच नाहक बदनाम झाले आहेत. येत्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मी जरी विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी या कायद्याच्या विरोधात प्रभावीपणे बाजू मांडून महाराष्ट्रातील गोरगोरिब जनतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गप्प बसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, मधुकर साळवे, तसेच पार्वतीबाई ढोकणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याठिकाणी मोर्चात सहभागी झालेल्या महिलांच्या हस्ते राहुरीचे तहसीलदार फसियोद्दिन शेख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी जि.प चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, जि.प सदस्य धनराज गाडे, प्रभाकर गाडे, किरण कडू, संतोष आघाव, नंदकुमार तनपुरे, सागर तनपुरे, बाळासाहेब उंडे, विलास तनपुरे, किसन जवरे, राजेंद्र बोरकर, सुरेश निमसे, उत्तम पवार, अशोक आहेर, बाळासाहेब खुळे, ईश्वर कुसमुडे, एकनाथ ढवळे, सुनील आडसुरे, इंद्रभान पेरणे, डॉ.राजेंद्र बानकर, प्रकाश भुजाडी, अ‍ॅड. राहुल शेटे, महेश उदावंत, रविंद्र आढाव, ज्ञानेश्वर बाचकर, बाळासाहेब लटके, मधुकर पवार, अण्णासाहेब बाचकर, भाऊसाहेब आढाव, नितीन बाफना, राहुल म्हसे, सूर्यकांत भुजाडी,माणिक तारडे, भारत तारडे, संदीप सोनवणे, आश्विनी कुमावत, लक्ष्मण म्हसे, नंदकिशोर पेरणे, ज्ञानेश्वर जगधने आदींसह ग्रामिण भागातील जनता उपस्थित होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com