
उंबरे |वार्ताहर| Umbare
राहुरी तालुक्यात मुले-मुली पळून जावून लग्न लावून पुन्हा दिमाखात पोलीस ठाण्यात हजर होतात. सज्ञान असल्याने ते कोणत्याही गुन्ह्यात अडकत नसल्याने धाडसाने पोलिसांसमोर आपली बाजू मांडतात. मात्र, आई-वडिलांना पोलीस ठाण्यातून माना खाली घालून परत येण्याची वेळ येत असून त्यामुळे पालकवर्गात चिंता व्यक्त होत आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यात राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात शेकडो अशा घटना घडल्याने सर्व मुलींचे आई-वडील चिंतातूर झाले असून अशा मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी गावागावातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येऊन यांना धडा शिकवावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
राहुरी तालुक्यातील 96 गावं असून या गावांमधून अनेक मुली तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आपले आई-वडील त्यांना बाहेर पाठवत आहेत. अनेक ठिकाणी त्यांना जवळ उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे इतरत्र कॉलेजवर शिक्षणासाठी जाण्याची वेळ येते. अशा वेळेस फक्त त्यांना शाळेमध्ये घेऊन जाणे किंवा घेऊन येणे ही जबाबदारी काही पालक पार पडतात. तर अनेक मुली स्वतःची गाडी किंवा बसने प्रवास करत असतात. अशा वेळेस मुलगी सकाळी आठ वाजता घरच्या बाहेर पडली तर संध्याकाळी सहा ते सात वाजता घरी परत येते. या कालखंडामध्ये कोणत्याच मुलीचा पालक आपली मुलगी काय करते हे पाहण्यासाठी जाऊ शकत नाही. क्वचित काही पालक गेले तर त्यांना मात्र, मुली आपल्या शाळेतच दिसतात. खरंतर यामध्ये मुलींची चूक कमी प्रमाणात असते. परंतु या पाठीमागचा शोध घेतला तर मोठे गौडबंगाल कहाणी ऐकायला मिळत आहे.
या मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी अनेक तरुण कॉलेजमध्ये प्रयत्न करत असतात. त्यांच्या प्रयत्नाला यश येण्यासाठी त्यांच्या पाठीशी मुली पळून जाण्यास मदत करणे किंवा त्यांना पळून जाण्यास मुलांच्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी प्रत्येक ग्रामीण भागातील गावांमध्ये काही तरुणांची फळी निर्माण झालेली आहे. या टोळ्या फक्त मुलींना मुलांच्या जाळ्यात गोवण्यासाठी मदत करणे, मुलींना पळून जाण्यासाठी भाग पाडणे व त्या मुलीला त्या मुलाबरोबर लग्न लावण्यासाठी थेट आळंदी किंवा नाशिक अशा ठिकाणी जाऊन त्यांचा विवाह लावून त्यांना आर्थिक मदत करून व संरक्षण देऊन त्या कालावधीमध्ये ही व्यवस्था पार पाडण्यासाठी काही विकृत प्रवृत्तीची यंत्रणा यामध्ये उतरलेली आहे.
एकदा त्या मुलीचा विवाह झाला की, ती मुलगी व तो मुलगा किमान पंधरा दिवस अथवा एक महिना बाहेरच कुठेतरी नातेवाईक किंवा इतरत्र घर भाड्याने घेऊन राहण्यासाठी त्यांची हे तरुण व्यवस्था करतात. मात्र जी मुलगी आपल्या घरातून त्या मुलासोबत निघून जाते, त्यावेळेस तिचे आई, वडील, भाऊ, चुलते व इतर नातेवाईक अस्वस्थ झालेले असतात. त्या मुलीचा शोध घेण्यासाठी अनेक पालक गाड्या करून बाहेर पाहण्यासाठी जातात तर आपल्या मुलीला पळून जाण्यासाठी कोणत्या मुलांनी मदत केली असावी, त्या मुलांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात करतात. अशा वेळेस ही मुलं उडवा उडवीचे उत्तरे देऊन त्या पळून जाऊन लग्न करणार्या जोडप्यास आर्थिक मदत करतात. मात्र, मुलगी सज्ञान असल्यामुळे आई-वडील मात्र गोंधळून जातात.
काही वेळेस आई-वडील आठ आठ दहा दिवस उपाशी पोटी राहून आपल्या मुलीच्या चिंतेत असतात. अशातच पोलीस स्टेशनला गेले तर त्या ठिकाणी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली जाते. पोलिसांनाही एका आठवड्यात अशी दहा ते पंधरा प्रकरणं येऊ लागल्यामुळे तेही हातबल होतात. मात्र काही मुली व मुलं पोलिसांच्या धाकाने पोलीस ठाण्यात हजर होतात. त्यावेळी पोलीस त्या मुलीच्या व मुलाच्या आई-वडिलांना बोलावून घेऊन त्यांच्यात समोरासमोर चर्चा घडवून आणतात. अशा परिस्थितीमध्ये ती मुलगी मात्र बेफान झालेली असते. तिच्यासमोर आपले आई-वडील व इतर नातेवाईक ही सुद्धा तिच्या दृष्टीने कमीच असतात. मुलगी पोलीस ठाण्यात एकच बोलते की मला हाच मुलगा नवरा म्हणून पाहिजे. मला बाकीचे काही नाही पाहिजे. यावेळेस अनेक आई-वडील आपल्या मुलींना परत येण्यासाठी भीक मागतात परंतु, मुलगी त्या मुलाच्या वेड्या प्रेमापोटी व लग्न लावून आली असल्यामुळे माहेरी जाण्यास नाकार देते.
काही वेळेस पोलीसही मुलीला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु मुलगी बेफान झाली असते. अशा वेळेस मुलीची आई वडील त्या ठिकाणाहून निराश होऊन परत घरी येतात. काही ठिकाणी तर मुलीने इच्छेविरुद्ध लग्न केलं तर त्या मुलीच्या आई-वडिलांनी आत्महत्याही केल्याचे पहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक मुलींनी आंतरजातीय विवाह करून आपल्या आई वडिलांच्या माना खाली घालण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक मुलीचे आई-वडील मुलीला शिक्षणासाठी बाहेर का ठेवतात. तर आपली मुलगी शिकली पाहिजे म्हणून, त्या मुलीने समाजामध्ये नाव कमावलं पाहिजेत, हा दृष्टिकोन मुलीच्या आई-वडिलांचा असतो.
शिक्षण घेत असताना अनेक मुलींनी आपल्या आई वडिलांचे नाव जिल्ह्यात नाहीतर महाराष्ट्रात मोठे केले आहे. बोटावर मोजण्या इतक्या मुलींनी पळून जाऊन विवाह करणे, आंतरजातीय विवाह करणे, यामुळे आपल्या आई वडिलांना व नातेवाईकांना शरमेने मान खाली घालण्याची वेळ आणली आहे. अशा घटना राहुरी तालुक्यामध्ये सर्वाधिक झाल्यामुळे राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलींचे आई-वडील या गोष्टीमुळे चक्रावून गेले आहेत. आणि गावामध्ये असे झालेले विवाह सहा महिने, एक वर्ष यापेक्षा जास्त दिवस टिकले पण नाही. नंतर त्या मुलीचे फार हाल होतात व शेवटी ती मुलगी आपल्या आई-वडिलांकडे जाण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेस त्या मुलीला कोणीही जवळ करत नाही. त्यासाठी मुलींनी पळून जाण्या अगोदर पूर्ण आपल्या आई वडील व कुटुंबाचा नातेवाईकाचा विचार करावा.
अनेक आई-वडील मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत असतानाच त्याचाच फायदा घेऊन अनेक मुले त्या मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी विवाह करतात व त्या मुलांना साथ देण्यासाठी त्यांच्या भोवती काही टोळके तयार होतात या टोळक्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक गावातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन यांचा बंदोबस्त केला तर अशा गोष्टीला आळा बसेल अशा भावना ग्रामीण भागातील मुलींचे आई-वडील बोलून दाखवतात.