राहुरी तालुक्यात कृषी विभागाच्या ‘ठोकळ’ नियोजनामुळे खरीप पिछाडीवर

अवघ्या 40 टक्के क्षेत्रावर पेरण्या; पावसाअभावी पेरण्यांचा खेळखंडोबा
राहुरी तालुक्यात कृषी विभागाच्या ‘ठोकळ’ नियोजनामुळे खरीप पिछाडीवर

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात लागोपाठ रोहिणी व मृग नक्षत्राने अंगठा दाखविल्याने खरिपाच्या पेरण्यात राहुरी तालुका पिछाडीवर गेला आहे. त्यातच राहुरीच्या कृषीविभागाची उदासिनता आणि खतांची कृत्रिम टंचाईने शेतकरी हैराण झाला असून पुरेशा पावसाअभावी पेरलेले उगवते की नाही? अशी धास्ती बळिराजाने घेतली आहे. तालुक्याच्या बागायती क्षेत्रात अवघ्या 40 टक्के पेरण्या झाल्या असून जिरायत क्षेत्रात मात्र, अद्यापही पावसाअभावी पेरण्यांचा खोळंबा झाला आहे. पावसाचा तब्बल सव्वामहिना उलटूनही पावसाने दडी मारल्याने आता दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांसमोर उभे राहणार असल्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बागायती भागातील 40 टक्क्यांमध्ये सोयाबीन, बाजरी व कपाशी पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. तर जिरायती भागात मूग, मका व भूईमुगाच्या अत्यंत कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे यंदा खरीप हंगामाला अपुर्‍या पावसाचा फटका बसणार आहे. जून महिन्यात तालुक्याच्या सात महसूल मंडलांत एकूण 133 मिमी. म्हणजेच 125 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पिके संकटात सापडलेली आहेत. तालुक्यात खरिपाचे पेरणीखालील क्षेत्र 26 हजार हेक्टर इतके आहे.

मात्र, यावर्षी सुमारे 30 हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जूनअखेर बाजरीची 1 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागातील ताहाराबाद, मल्हारवाडी, चिंचाळे, वरशिंदे, वावरथ जांभळी, कुरणवाडी, गडदे आखाडा, जांभुळवन, आदी भागात बाजरीची पेरणी करण्यात आली आहे. कपाशीच्या साडेपाच हजार हेक्टरवर म्हणजे 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीनच्या 1 हजार 300 हेक्टर (64 टक्के) पेरण्या झाल्या आहेत. तर तुरीच्या 35 हेक्टरवर (74 टक्के) पेरा पूर्ण झाला आहे.

यंदा मका पिकाची निच्चांकी म्हणजे 285 हेक्टरवर तर मुगाची पाच टक्के क्षेत्रावर (54 हेक्टर) पेरा झाला आहे. भूईमुगाच्या पेरण्या अवघ्या दोन हेक्टरवर झाल्या आहेत. एकूण 8 हजार 224 हेक्टरवर 40 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. चारा पिकांच्या 8 हजार 800 हेक्टर तर उसाच्या 503 हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. राहुरी मंडळात 134 मिमी, सात्रळ 99 मिमी, ताहाराबाद 96 मिमी, देवळाली प्रवरा 143 मिमी, टाकळीमिया 148 मिमी, ब्राम्हणी 140 मिमी, तर वांबोरीत सर्वाधिक 173 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मागील आठवड्यात मुळा धरणार्‍या पाणलोटात पाऊस सुरू झाल्याने धरणात नव्याने 1100 क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. मात्र, आता पाऊस थांबल्याने आवक मंदावली आहे. 26 हजार दलघफूट पाणीसाठवण क्षमतेच्या मुळा धरणात सध्या 8 हजार 900 दलघफूट (35 टक्के) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. जून महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जुलै महिन्यात हमखास बरसणार्‍या पावसाकडे शेतकर्‍यांचे लक्ष वेधले आहे.

राहुरी तालुक्यात यंदा खरीप हंगामात शेतकर्‍यांची मोठी हेळसांड झाली आहे. दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली. त्यातच आवर्तनाची मागणी करूनही आवर्तनात मुळा पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांची चालढकल केली. तर भंडारदरा उजव्या कालव्यावरील आवर्तन शेतकर्‍यांची मागणी असूनही ‘डिमांड’ नसल्याचे कारण सांगून व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आदेश देऊनही बंद केल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. तर राहुरी तालुक्यात कृषीविभागाच्या अधिकार्‍यांचे ‘ठोकळ’ नियोजन झाल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. खतांची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com