देवळालीसह 17 गावांची सुरक्षा अवघ्या सात पोलिसांकडे

पोलिसांच्या अपुर्‍या संख्याबळामुळे गुन्हेगारी वाढली
देवळालीसह 17 गावांची सुरक्षा अवघ्या सात पोलिसांकडे

देवळाली प्रवरा (वार्ताहर)

देवळाली प्रवरा येथील औटपोस्ट कायम सुरू राहण्यासाठी आणखी दोन पोलीस कर्मचारी देणार असल्याने आता देवळाली प्रवरा येथील पोलिसांचे संख्याबळ वाढणार आहे. मात्र, आता अवघे सात ते आठ पोलीस देवळाली प्रवरासह 17 गावांचा कायदा व सुव्यवस्थेचा डोलारा कसा सांभाळणार? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, देवळाली प्रवरासाठी नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अद्यापही लालफितीतच अडकल्याने नवीन पोलीस ठाणे केव्हा होणार? असाही सवाल नागरिकांनी केला आहे.

देवळाली प्रवरासह 17 गावांसाठी देवळाली प्रवरा येथे ब्रिटिशकालीन औटपोस्ट आहे. तात्कालीन लोकसंख्या कमी असल्याने त्यावेळी असलेले तीन पोलीस कर्मचारी काम सांभाळत होते. परंतु आता लोकसंख्या चारपटीने वाढली असून देखील याठिकाणी चार ते पाच पोलीस कर्मचारी नेमणुकीस असतात. यातील काहींना राहुरी पोलीस स्टेशन येथे बोलवले जाते. तर काही बंदोबस्तासाठी गेलेले असतात.

पोलीस संख्याबळ अपुरे असल्याने हे औटपोस्ट बर्‍याचदा बंदच असते. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती या औटपोस्टची झाली आहे. येथील बाजारतळावरील 11 टपर्‍या एकाच रात्रीत फोडण्यात आल्या. सोसायटी डेपोवरील अनेक ठिकाणी घरफोड्या झाल्या. या सर्व घटनांचे सीसीटीव्ही फुटेज त्यावेळी मिळालेले असून देखील अद्यापपर्यंत या घरफोड्यांचा तपास लागलेला नाही. दारू, मटका, जुगार आदी अवैध धंद्यांना उधाण आले आहे.

सडकसख्याहारी दिवसाढवळ्या शाळकरी मुलींची छेड काढताहेत. टारगट दुचाकीवर टिबलसीट बसून मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने दुचाकी फिरवित असतात. आठवडा बाजारात मोबाईल चोरी, पैशाचे पाकीट चोरी, भांडण, मारामार्‍या हे प्रकार नित्याचे झाले आहेत. अनेकांकडे गावठी कट्टे आहेत. याचा धाक दाखवून नागरिकांना वेठीस धरण्याचे अनेक प्रकार झाले आहेत. अवैध धंद्यांबरोबरच अवैध खासगी सावकारी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. यातूनही अनेक गंभीर घटना समोर आल्या आहेत. हे सर्व पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक न राहिल्याने झाले आहे.

अपुरे पोलीसबळ असल्याने गुन्हेगारांचे फावले जात आहे. काही घटना घडली तर नागरिकांना तक्रार देण्यासाठी थेट राहुरी पोलीस स्टेशन गाठावे लागते. येथील कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवायाची असेल तर याठिकाणी कमीत कमी दहा पोलीस असणे आवश्यक आहे. सध्या याठिकाणी एक पोलीस हेड कॉन्स्टेबल व दोन किंवा तीन पोलीस कर्मचारी कार्यरत असतात. त्यामध्ये वाढ करण्यासाठी नागरिकांनी पोलीस कर्मचारी वाढवून देण्याची मागणी केली आहे. मात्र, आता तातडीने दोन कर्मचारी वाढून देणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com