
वळण | वार्ताहर
राहुरी (rahuri) तालुक्यातील पूर्वभागात ऊस तोडणीसाठी (sugarcane harvesting) एका मुकादमाने पिंपरी (pimpari) येथील शेतकरी जालिंदर रंगनाथ काळे यांच्याकडे दीड एकर उसाचे क्षेत्रासाठी २५ हजारांची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पर्यायाने पैशाअभावी शेतकऱ्यांना 'कोणी ऊस तोड देता ऊसतोड' अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
सध्या शेतकरी अडचणीत असून शेतकऱ्यांच्या उसाला भाव नाही. चालूवर्षी विजेच्या खेळखंडोबामुळे उसाला पाणी देता येत नाही. त्यामुळे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून उसाला पाणी नाही. त्यातच उसाला तुरे आले आहेत. त्यामुळे ऊस तोडणीवाले शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. एकीकडे चालू वर्षी उसाचे सरासरी उत्पादन घटून ते २५ ते ३० टनावर गेले आहे. तर उसाचे भाव साखर कारखान्यांनी अठराशे तर काही कारखान्यांनी दोन हजार १००, काही कारखान्यांनी २३०० रुपये भाव दिला आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तसेच मुळा नदीवरील केटीवेअर भरलेले आहेत. त्यामुळेशेतकऱ्यांना नदीकाठी भरपूर पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागण केली. मात्र, ऊस तोडणी करता शेतकरी राजा हतबल झाला आहे.
एकीकडे कारखान्याचे शेतकी ऑफिस व मास्तर हे आपापल्या गावपुढाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे ऊसतोडणी देताना आपापल्या कार्यकर्त्याला सुरुवातीला ऊस तोडी दिल्या आहेत. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागताच मजुरांचे भावही वाढू लागले आहेत. राहरी तालुक्याच्या पूर्व भागात शेतकरी ऊस तोडणी करता धावपळ करीत आहेत. एकीकडे रासायनिक खताचे भाव गगनाला भिडले आहेत तर दुसरीकडे डिझेलचे भाव वाढल्यामुळे सर्वच भाव वाढले आहेत, असे शेतकरी राधेशाम लहारे, सुदामराव शेळके, ऋषिकेश आढाव, धनंजय आढाव, कारभारी खुळे, ज्ञानदेव कारले आदींनी सांगितले.
ऊस तोडीवाले सध्या ऊस तोडताना ऊस पेटवून देतात. नंतर घेऊन जातात. एकतर सध्या उसाला पाणी नाही, उसाचे वजन घटले आहे, शेतकऱ्याला सध्याची परिस्थितीत इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती निर्माण झाली आहे.