राहुरी तालुक्यात हजारो हेक्टर पिके पाण्याखाली
सार्वमत

राहुरी तालुक्यात हजारो हेक्टर पिके पाण्याखाली

शेतकर्‍यांवर आभाळच फाटले; तातडीने पंचनामे करून भरपाईची मागणी

Arvind Arkhade

राहुरी|प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यात मागील आठवड्यात सलग दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. शेताला शेततळ्याचे स्वरूप आले असून पिके पाण्यात सडून चालली आहेत. तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून त्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

लॉकडाऊनच्या काळात शेतीमालाला कवडीमोल भाव मिळाला. त्यातच आता मुसळधार पावसामुळे शेतातील उभी पिकेही जमीनदोस्त झाल्याने शेतकर्‍यांवर आभाळ फाटले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. फळबागांमध्येही पाणी साचले असून काही ठिकाणी फळबागा जमीनदोस्त झाल्या असल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली.

करोना आणि आता अतीव पावसाच्या चक्रव्युहात अडकलेल्या शेतकर्‍यांना तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, चैतन्य दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेेंद्र थोरात, छावा शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सतीश सौदागर, मराठा एकीकरण समितीचे समन्वयक देवेंद्र लांबे, सत्यवान पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुंड, दिलीप हारदे, आदींसह शेतकर्‍यांनी केली आहे.

राहुरी तालुक्यात शुक्रवार आणि शनिवारी दोन दिवस दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेतात पाणी साचल्याने उभी पिके सडू लागली आहेत.

राहुरी तालुक्याच्या पश्चिमेकडील ताहाराबाद महसूल मंडलात अतीव पाऊस झाला. त्यामुळे कडधान्याची पिके सडून गेली. हा परिसर कडधान्याचे आगार म्हणून ओळखला जातो. हुलगे, मूग, तूर, भूईमूग, मठ, तीळ, हावरी, या पिकांसह बाजरी, सोयाबीन, कपाशी, लालकांदा ही पिके अतीव पावसामुळे सडून गेली आहेत. तर तालुक्यातील अनेक ओढे, नाल्यांना पूर आला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे.

म्हैसगाव, ताहाराबाद परिसरातील महसूल मंडलात पठार भागातील 80 टक्के शेती खरिपाखाली असते. तर 20 टक्के क्षेत्रावर रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी केली जाते. ताहाराबाद महसूल मंडलात गेल्या चाळीस वर्षात जून-जुलैमध्ये यंदा विक्रमी पाऊस झाला. अनेक तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

उर्वरित तालुक्यातील कनगर, चिंचविहिरे, भागातही ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे ओढे-नाल्यांना महापूर आला आहे. या भागातील रस्तेच पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांसह ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तर राहुरी तालुक्यातील पूर्वभागातही दमदार पाऊस झाला.

त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी महागडे बियाणे आणून व खते आणून खरिपांची पेरणी केली होती. मात्र, आता हा खर्च पाण्यात गेला असून शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकर्‍यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे व फळबागांचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

आडात नाही पण पोहोर्‍यात नाही, अशी स्थिती सध्या मुळा धरणाची झाली आहे. मुळा धरणाच्या पाणलोटात पावसाचा ठणठणात असून धरणातील नवीन पाण्याची आवक यंदा कमालीची घटली आहे. पाणलोटात नाही, पण लाभक्षेत्रात आहे.

लाभक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून पुष्य नक्षत्रातील श्रावणसरींच्या दमदार हजेरीमुळे श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, असे आल्हाददायक चित्र निर्माण झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com