राहुरी पोलिसांची निष्क्रीयता चोरट्यांनी आणली चव्हाट्यावर !

राहुरीत आडवी पेठेतील सराफ दुकान फोडले; ब्राम्हणी, चेडगाव, मोकळ ओहळला चोरीचे सत्र सुरूच
राहुरी पोलिसांची निष्क्रीयता चोरट्यांनी आणली चव्हाट्यावर !

राहुरी (प्रतिनिधी)

राहुरी तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी चोऱ्या, दरोडा आणि घरफोडी, दुकानफोडीची मालिका सुरू आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिक दहशतीखाली आले आहेत.

चोऱ्यांना आळा घालण्याचे निवेदन देण्यास गेलेल्या व्यापाऱ्यांना राहूरी पोलीस ठाण्यात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने आता व्यापाऱ्यांसह नागरिकांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे हे गुन्हेगारी रोखण्यास सपशेल अपयशी ठरल्याने त्यांची बदली करण्याची मागणी वाढू लागली आहे.

दोन दिवसांपूर्वी राहुरी शहरातील दारूचे दुकान फोडून अज्ञात दोन भामट्यांनी सुमारे सहा लाख रुपयांची रोकड पळविली. ही घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री शहरातील आडवी पेठ येथील भरपेठेतील सोनाक्षी ज्वेलर्स हे सराफाचे दुकान फोडून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. चोऱ्या होत असताना पोलीस गाढ झोपतात की काय ? असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.

राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी येथील रहिवाशी असलेले दत्तात्रय निवृत्ती डहाळे यांचे राहुरी शहरातील आडवीपेठ परिसरात सोनाक्षी ज्वेलर्स नावाचे सराफ दुकान आहे. दि. ९ डिसेंबर रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे दत्तात्रय डहाळे यांनी त्यांचे सराफ दुकान बंद करून घरी गेले होते. ते काल सकाळी दुकान उघडण्यासाठी आले. तेव्हा त्यांना कुलूपे तोडून शटर उचकटलेल्या अवस्थेत दिसले. दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब राहुरी पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून प्रथम दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकले. त्यानंतर दुकानात उचकापाचक केली. तेव्हा दुकानातील एक ते दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, एक ते दीड किलो चांदीचे दागिने व पाच ते सहा हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या घटनेबाबत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे. या चोरट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

...देवळाली प्रवरा येथे दोन दिवसांपूर्वी दुकाने व पोष्ट ऑफिस फोडण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे हे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांनी कोणतीही माहिती न घेता व आपल्या वाहनातून खाली न उतरता पाहणी केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. राहुरीचे पोलीस निरीक्षक उंटावरून शेळ्या हाकत असल्याचा संतप्त सूर नागरिकांमधून उमटला आहे.

ब्राम्हणी, चेडगाव, मोकळ ओहळला चोरीचे सत्र सुरूच

उंबरे (वार्ताहर)

राहुरी तालुक्यात चोरीची मालिका सुरूच असून देवळाली प्रवरा, टाकळीमिया, मानोरी, राहरी शहरांत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असताना ब्राह्मणी- चेडगाव, मोकळ ओहळ परिसरात आठ दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नागरिक आणि व्यापारी भयभीत झाले आहेत. चोऱ्यांचा तपास लावण्यास अपयशी ठरलेल्या पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांची बदली करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बुधवारी रात्री सोनईकडून येत असताना वंजारवाडी परिसरातील कन्हेरवस्ती ते घेरुमाळ वस्ती या रस्त्यावर परिसरातील एका स्थानिक व्यक्तीने पाच ते सहा अनोळखी व्यक्तींना पाहिले. लागलीच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. घेरुमाळ वस्ती परिसरातील नागरिकांनी चोरट्यांच्या दहशतीमुळे रात्र जागून काढली. मात्र, दुसरीकडे रात्री १२ वाजता चोरट्यांनी आपला मोर्चा मोकळओहळकडे वळवत फोटोग्राफर ईश्वर सुभाष लहारे यांच्या घरी शेळ्या चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या आजी जनाबाई मच्छिद्र लहारे यांना जाग आली. त्यांनी चोरट्यांना प्रतिकार केला. दरम्यान झटापट झाली आणि चोरीला जात असलेल्या शेळ्या चोरांच्या तावडीतून वाचल्या. यापूर्वी देखील या आजीबाईंनी चोरांपासून शेळ्या वाचविल्या आहेत.

रात्री अडीच वाजेच्या दरम्यान केंदळ रस्त्यावरील वाकडे वस्ती येथे सेवानिवृत्त वन कर्मचारी भानुदास वाकडे यांच्या तीन शेळ्या व एक बोकड तर, गेणू वाकडे यांच्या दोन शेळ्या गेल्या. चोर गेल्यावर लहान बकरे ओरडू लागली. त्यामुळे वाकडे यांना जाग आली. मात्र, तोपर्यंत चोर पसार झाले होते. निवृत्त वनअधिकारी भानुदास वाकडे यांच्यासह त्यांची मुले व पुतणे यांनी परिसरात पाहणी केली. मात्र, चोर दिसून आले नाहीत. घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.

दुसरीकडे चेडगाव परिसरातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान पोहीचा महादेव येथील मंदिरातील चार ते पाच घंट्या चोरट्यांनी पळविल्या. दरम्यान दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाला. गेल्या चार-पाच दिवसांपासून परिसरात गस्त सुरू आहे. याशिवाय ब्राह्मणी व चेडगाव या दोन्ही गावांत ग्राम सुरक्षा यंत्रणा असताना चोरीचे सत्र कायम असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com