सार्वमत

भाचे जावायाची शक्कल अंगलट : गेला गजाआड

पोलिसांनी बनाव केला काही तासांत उघड

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

विवाहानंतर पत्नीला नांदण्यास अडथळा आणणार्‍या मामे सासर्‍याच्या वाहनात गावठी कट्टा ठेवणार्‍या भाचे जावायचा बनाव तालुका पोलिसांनी काही तासांत उघड करत आरोपीला अटक केली. मुजीबशेख (रा. जखणगाव ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, काडतुसे असा 15 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शेख विरोधात तालुका पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार बापुसाहेब फोलाणे यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी शेख याने मैत्री झालेल्या मुलीसोबत प्रेम झाल्याने रितिरिवाजानूसार लग्न केले. मात्र, मुलीच्या मामाचा लग्नाला विरोध होता. त्यांनी भाची नांदायला पाठवायची नाही म्हणून तिला राहुरी येथील घरी नेले. पत्नीला माहेरी त्रास होत असून तिला नांदायला येऊन दिले जात नाही, पत्नीला नांदायला पाठवावे, यासाठी शेख याने नगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

एमआयडीसी पोलिसांनी शेख व त्याच्या पत्नीला घरच्यांसह मंगळवारी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. आरोपी शेख दहा ते बारा साथीदारांसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात आला. यावेळी पत्नी मामे सासर्‍या ज्या वाहनातून येत होती, त्यामध्ये याने गावठी कट्टा ठेवला. हे करण्यामागे मामे सासर्‍याला गुन्ह्यात अडकविण्याचा शेख याचा डाव होता.

यासाठी त्याने नगर- कल्याण रोडने येणार्‍या एका वाहनात गावठी कट्टा असल्याची खबर स्वतः नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांना दिली. रजपूत यांनी निमगाव वाघा फाट्यावर सापळा रचून संशयीत वाहनाला अडविले. पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये गावठी कट्टा, काडतुसे मिळून आले. हे वाहन राहुरी येथील असल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले.

तालुका पोलिसांचे पथक राहुरीच्या दिशेने रवाना झाले. तेवढ्यात तालुका पोलिसांना खबर मिळाली की त्या वाहनामध्ये ठेवलेला गावठी कट्टा आरोपी शेख यानेच ठेवला आहे. तालुका पोलिसांनी शेख याला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखविताच आरोपी त्याने कट्टा आपणच ठेवला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी शेख याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अखेर मामे सासर्‍या गुन्ह्यात अकडविणारा भाचे जावई पोलीसांच्या तावडीत सापडला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शंकरसिंग रजपूत, उपनिरीक्षक रितेश राऊत, पोलीस हवालदार गायकवाड,बापुसाहेब फोलाणे, संभाजी डेरे, पोलीस नाईक राहुल शिंदे, पोलीस शिपाई खिळे, महिला पोलीस नाईक गायकवाड यांच्या पथकाने केली. पुढील तपास उपनिरीक्षक रितेश राऊत करत आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com