राहुरी (प्रतिनिधी)
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणार्या राहुरी येथील तरुणावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी शहरातील पाच नंबर नाका येथील सुजल मनोज रासने या तरूणाने दोन दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अॅड. आंबेडकर यांच्या बाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. महेश साळवे या तरुणाला दि. 21 सप्टेंबर 2023 रोजी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ पाहत असताना त्याला सदर पोस्ट दिसली. ती आक्षेपार्ह पोस्ट पाहुन तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांची मने दुखावली गेली.
काल दि. 22 सप्टेंबर रोजी कार्यकर्त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली. यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सदर जातीयवादी तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी आरपीआय चे विलास साळवे, प्रवीण लोखंडे, सुनिल चांदणे, बबन साळवे, दिपक साळवे तर वंचित बहुजन आघाडीचे निलेश जगधने, पिंटूनाना साळवे, डॉ. जालिंदर घीगे आदिंसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महेश इंद्रभान साळवे या तरुणाच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात सुजल मनोज रासणे या तरुणावर गु.र.नं. 1101/2023 भादंवि कलम 505 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी सुजल रासणे हा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.