राहुरीत गुन्हेगारीचा आलेख वाढल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात

कैदी पलायन प्रकरणात पोलीस अधिकार्‍यांना क्लिनचीट
राहुरीत गुन्हेगारीचा आलेख वाढल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी कारागृहातून पाच आरोपी पळून गेल्यानंतर राहुरी पोलीस स्टेशनचा एक अधिकारी व चार पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्याची कारवाई अन्यायकारक असून याबाबतीत ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असा प्रकार होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. दरम्यान, राहुरी तालुक्यात चोर्‍या, दरोडे, घरफोडी, दुकानफोडी, अपहरणासारख्या घटना घडूनही वरिष्ठ अधिकारी राहुरीतील पोलीस अधिकार्‍यांना पाठीशी घालत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या दुर्लक्षामुळेच गुन्हेगारी वाढली असून अवैध धंदेही बोकाळले, त्यातच आता कैदीही पसार होत असल्याने राहुरी पोलिसांची नाचक्की झाली आहे. त्यामुळे तातडीने इंगळे यांची बदली करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वास्तविक त्या-त्या तालुका पोलीस स्टेशनची जबाबदारी तेथील वरिष्ठ अधिकार्‍यांवरच असते. पोलीस स्टेशनमधून गज कापून पाच आरोपी पळून जातात. त्यापैकी तीन सापडतात, अजूनही दोन फरार आहेत. राहुरी शहर व तालुक्यात चोर्‍यांचे सत्र सुरू असून एकाही चोरीचा तपास लावण्यात राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी यशस्वी झालेले नाहीत. राहुरी तालुक्यात अवैध धंदे, बेकायदा दारूविक्री, मटका, बिंगो जुगार, गुटखा विक्री जोरात सुरू असताना पोलीस खात्याकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. नगर-मनमाड रस्त्यावर वाहतुकीची कोंडी तर नित्याचीच बाब झालेली असताना राहुरी वाहतूक शाखा मात्र, राहुरीच्या पाण्याच्या टाकीजवळ मास्क नाही, हेल्मेट नाही, लायसन्स नाही, यासारखे अपराध दाखवून वाहनधारकांची अडवणूक करण्यातच धन्यता मानत आहेत.

शुक्रवारी रात्री गावातून जवळपास सोनई फाटापर्यंत वाहतूक पूर्णपणे दोन तास बंद असताना वाहतूक पोलीस शाखा मात्र, कोठे हरवली होती? स्थानिक नागरिकच या वाहतुकीचे नियमन करून कोंडी तोडण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. सध्या पूर्णपणे अपयशी ठरलेल्या राहुरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर वरिष्ठांनी योग्य तो निर्णय करून राहुरीला सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राहुरीतील व्यापारी व नागरिकांमधून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com