राहुरीच्या पूर्वभागात कपाशी लागवडीची लगबग सुरू

राहुरीच्या पूर्वभागात कपाशी लागवडीची लगबग सुरू

वळण |वार्ताहर| Valan

राहुरी तालुक्यातील पूर्वभागात शेतकर्‍यांची कपाशी लागवडीची लगबग सुरू झाली आहे. राहुरी तालुक्याच्या पूर्वभागात वळण, मानोरी, पिंपरी, चंडकापूर, खेडले परमानंद, पाथरे, खुडसरगाव, मांजरी आदी गावामध्ये कपाशी लागवडीस सुरुवात झाली आहे.

अक्षय तृतीयाच्या नंतर शेतकरी कपाशी लागवडीस सुरुवात करीत असतो. सध्या करोना महामारीमुळे शेतकर्‍यांच्या मालाला भाव नाही. आपापल्या शेतामध्ये काहीना काही पीक उभे करण्याकरीता शेतकर्‍यांची धडपड चालू असते. चालू वर्षी कपाशी पिशवी 34 रुपये आहे. शेतकर्‍याला एकरी दोन पिशव्या बियाणे लागते. तसेच दहा ते पंधरा हजार रुपयाचे खत लागते. पाच ते सात पाणी लागते. वेळेवर पाऊस झाला तर फक्त लागवडीसाठी पाणी लागते. शेतकरी एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च करतो. त्यानंतर उत्पन्न एकरी 15 ते 18 क्विंटल निघते. पण शेतकर्‍याला कपाशीसाठी चांगले वातावरण पण लागते. अतिवृष्टी झाल्यास शेतकर्‍याच्या हातात काहीच लागत नाही. पण तरीसुद्धा शेतकरी काहीना काही करण्याचे धाडस करतो.

शेतकर्‍यांची कितीही अडचण असली तरी व्यापार्‍यांकडून बियाणे, खते, मजूर यांना अगोदर पैसे द्यावे लागतात, असे शेतकरी सीताराम बाबा गोसावी, शिवाजी टेकाळे, यांनी सांगितले. काही शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणी केली आहे. शंकरराव पाटील म्हणाले, एकरी 25 किलो सोयाबीनचे बियाण्याची पेरणी केली आहे. यापूर्वी सोयाबीनची बॅग तीस किलोची होती. पण आता भाव वाढल्यामुळे 25 किलोची बाजारात उपलब्ध असून तिची किंमत 3300 रुपये आहे. यापूर्वी बियाण्याची बॅग 50 किलोची होती. मागच्या वर्षी 30 किलोची होती. पण चालूवर्षी सोयाबीनला भाव वाढल्यामुळे व्यापार्‍यांनी 25 किलोची भरती केली आहे, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com