राहुरी तालुक्यात 48 तासांत 376 जणांना करोना

राहुरी तालुक्यात 48 तासांत 376 जणांना करोना
File Photo

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासात पुन्हा करोनाचा उद्रेक झाला. दोनच दिवसात 376 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यातच लसीकरणही ठप्प झाल्याने करोना संसर्गाचा धोका वाढू लागला आहे.

दरम्यान, तालुक्यातील एकूण 1 हजार 227 नागरिकांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण बळींची संख्या 101 वर जाऊन पोहोचली आहे.

बुधवारी 178 नागरिकांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर काल गुरूवारी 198 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे गेल्या 48 तासात एकूण 376 नागरिक करोनाग्रस्त झाले. राहुरी शहरातही दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत असून देवळाली प्रवरातही संसर्गाचा धोका वाढला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागालाही करोना महामारीने विळखा घातल्याने आता नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण ठप्प झाले असून अपुर्‍या पुरवठ्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. लसीकरणासाठी येत असलेल्या नागरिकांकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला असून लसीकरणाचे केंद्र नागरिकांच्या गर्दीमुळे ‘सुपर स्प्रेडर’ ठरू लागली आहेत. आरोग्य, पोलीस व महसूल प्रशासनाच्या नियोजनशुन्यतेमुळे तालुक्यात करोनाचा संसर्गाचा धोका वाढल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत कुटुंब कोव्हिड सर्व्हे तालुक्यात सुरू झाला असून सुमारे एक हजाराहून अधिक कर्मचार्‍यांचे पथक यासाठी तयार करण्यात आले आहे. मात्र, या पथकाची आरोग्य चाचणी करण्यात आलेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या पथकाकडून नागरिकांना किंवा नागरिकांकडून या पथकाला संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित प्रशासनाचा आडमुठेपणा उघड झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com