राहुरी तालुक्यात करोनाचा कहर; बाधितांची संख्या 23 वर
सार्वमत

राहुरी तालुक्यात करोनाचा कहर; बाधितांची संख्या 23 वर

एकाच दिवशी तब्बल नऊ जणांना करोनाची बाधा ; शहरातही एण्ट्री

Arvind Arkhade

राहुरी|प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यात काल करोनाचा कहर झाला. काल एकाच दिवशी तब्बल नऊजणांना करोनाची बाधा झाल्याने आता नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. राहुरी शहरातही करोनाने एण्ट्री केली असून शहरासह तालुक्यात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

काल एकाच दिवशी करोनाने राहुरी शहरासह ग्रामीण भागातही धुमाकूळ घातला. देवळाली प्रवरातील शेटेवाडी पाठोपाठ काल गुरूवारी (दि.16) राहुरी फॅक्टरी परिसरात चार तर म्हैसगाव येथे पुन्हा एक रूग्ण करोनाबाधित आढळून आला. तर वळण, कात्रड, सोनगाव येथेही करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

राहुरी फॅक्टरी येथील तिघेजण एकाच कुटुंबातील असून त्यातील कुटुंबप्रमुख हा तांदुळवाडी येथील बाधित रुग्णाचा चालक असल्याने त्याला व त्याच्या कुटुंबाला करोनाची बाधा झाली. तर म्हैसगावमध्ये दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे.

राहुरी शहरातही पहिलाच करोनाचा रुग्ण आढळून आला आहे. राहुरी शहराच्या मध्यवर्ती भागात राहणार्‍या एका व्यापार्‍याला करोनाची बाधा झाली. खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत शेटेवाडी भागातील 36 वर्षीय तरुण बुधवारी बाधीत आढळला. तर शासकीय प्रयोगशाळेत राहुरी कारखाना येथील 45 वर्षीय तरुण चालक, त्याची 38 वर्षीय पत्नी व 15 वर्षांचा मुलगा असे तिघेजण बाधित आढळले.

तर राहुरी फॅक्टरी येथे एका तरुण शेतकर्‍याला करोनाची बाधा झाल्याचा अहवाल काल सायंकाळी प्राप्त झाला. हा तरुण राहुरी येथील एका खासगी रुग्णालयात रक्तदाबाची तपासणी करण्यासाठी गेला होता. तेथे वरवंडी येथील करोनाबाधित रुग्ण उपचार घेत असल्याने तेथेच त्या तरुण शेतकर्‍याला करोनाची बाधा झाली. त्यामुळे आता देवळाली प्रवरा शहराचे नाव एकाचवेळी पाच रुग्णांनी करोना यादीत खाते उघडून झळकावले आहे.

दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील एक राजकीय व्यक्ती व त्यांचे कुटुंब बाधित निघाले आहे. देवळाली प्रवरातील तो बाधित रुग्ण तालुक्यातील एका राजकीय पुढार्‍याच्या संपर्कात आल्याने बाधित निघाला आहे. तर त्या राजकीय व्यक्तीच्या वाहन चालकासह त्याची पत्नी, मुलगा असे तिघे करोनोबाधित आढळले आहेत. शेटेवाडी येथील त्या रुग्णाच्या घरातील चार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

तांदुळवाडी येथील ती व्यक्ती बाधित निघाल्याने राहुरी फॅक्टरी येथील त्या वाहनचालक तरुणाने स्वतः खासगी प्रयोगशाळेत घशातील स्त्राव तपासणी करून घेतला असता तो बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्या वाहनचालकास दि. 12 जुलै रोजी क्वारंटाईन करून घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्यांना उपचारासाठी कृषी विद्यापीठात ठेवले आहे.

करोनाबाधित यादीत कालपर्यंत देवळाली प्रवराचे नाव आले नव्हते. अखेर देवळाली प्रवराच्या नावावर एकाचवेळी पाच रुग्णांचे शिक्कामोर्तब झाले आहे. नगरपालिकेने शेटेवाडीचा काही भाग, राहुरी कारखाना येथील कराळेवाडीत औषध फवारणी करून पत्रे ठोकून नाकाबंदी केली आहे.

राहुरी तालुक्यातील राजकीय कुटुंब करोनोबाधित निघाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील एका दूध संघातील सर्व कामगारांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या कामगारांमधील तो कामगार क्वारंटाईन असतानाही घरी येत होता. नावापुरता क्वारंटाईन झालेला होता. क्वारंटाईन असताना तो घरी कसा येत होता? क्वारंटाईनच्या ठिकाणी नेमणुकीस असणारे अधिकारी काय करीत होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राहुरी शहरासह ग्रामीण भागात अनेक होम क्वारंटाईन केलेले नागरिक खुलेआम मोकाट फिरत आहेत. तर ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने राहुरी तालुक्यात करोनाने विळखा घालण्यास सुरूवात केल्याने नागरिकांनी महसूल आणि आरोग्य प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

राहुरी शहरासह ग्रामीण भागात अनेक होम क्वारंटाईन केलेले नागरिक खुलेआम मोकाट फिरत आहेत. तर ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने राहुरी तालुक्यात करोनाने विळखा घालण्यास सुरूवात केल्याने नागरिकांनी महसूल आणि आरोग्य प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com