राहुरी तालुक्यात ‘करोना, प्रशासनाला आवरेना’

48 तासांत 388 जणांना करोनाची बाधा
राहुरी तालुक्यात ‘करोना, प्रशासनाला आवरेना’
File Photo

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात गेल्या 48 तासांत करोनाग्रस्तांची आकडेवारी ‘रेकॉर्डब्रेक’ करणारी ठरली. शनिवारी (दि.17) रोजी 186 तर रविवारी (दि.18) रोजी 202 जणांना करोनाची बाधा

झाल्याचे आढळून आले. त्यामुळे आता राहुरी तालुुक्यात करोना, प्रशासनाला आवरेना, अशी स्थिती प्रशासनाची झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

मागील आठवड्यात तब्बल 1 हजार 185 नागरिकांना करोनाची बाधा झाली. तर एकाच आठवड्यात सातजणांचा करोनामुळे बळी गेला. त्यामुळे राहुरी तालुक्यातील बळींची एकूण संख्या 80 वर गेली आहे. तर तालुक्यात एकूण 5 हजार 328 जणांना करोनाची बाधा झाली. त्यातील 4 हजार 265 नागरिकांवर उपचार पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित 983 नागरिकांवर तालुक्यातील विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

राहुरी विद्यापीठात 347 रुग्ण क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. तर वांबोरी येथे 24 रुग्ण उपचार घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी देसवंडी येथील 45 वर्षीय महिलेचा करोनाने बळी गेला. तर आठवडाभरातच सातजण मृत्यूमुखी पडले. मात्र, खडबडून जागे झालेल्या पोलीस आणि महसूल प्रशासनाने बळींची व रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्याही उपाययोजना हाती घेतलेल्या नाहीत. त्यातच आरोग्य प्रशासन अद्यापही झोपेत असल्याने करोनारुग्णांची तालुक्यात मोठी हेळसांड सुरू आहे.

करोनाग्रस्तांना कोणीही वाली राहिला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नातेवाईकांमधून उमटत आहेत. तालुक्यातील प्रशासन आणि पुढार्‍यांनीही रुग्णांच्या आरोग्य सुविधेकडे पाठ फिरविल्याने कोव्हिड सेंटरचालकांच्या गोरखधंद्याला तेजी आली आहे. त्यात रुग्णांचे नातेवाईक आर्थिकदृष्ट्या पिळवटून निघत आहेत. त्याकडे आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून ऑडिटर नेमणुकीचा फार्स कूचकामी ठरला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com